
Mumbai News : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास एक तास चर्चा झाली असल्याचे समजते. काका-पुतण्याच्या या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील या दोन प्रमुख नेत्यामध्ये बुधवारी सायंकाळी जवळपास एक तास विविध विषयावर चर्चा झाली असल्याचे समजते. प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व ज्येष्ठ नेते शरद पवार या दोन नेत्यांमध्ये मळेगाव साखर कारखान्याबाबत चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच यावेळी या दोन नेत्यांमध्ये शेती, राज्यात उदभवलेल्या पूरपरिस्थितीसह व विविध विषयावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीत पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत किती पंचनामे झाले आहेत, अशी विचारणा शरद पवार यांनी अजित पवार यांना केल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनीदेखील शरद पवार यांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासंदर्भातही या दोघांमध्ये चर्चा झाली. या शिवाय या दोन्ही नेत्यांत काही कौटुंबिक विषयांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे एकत्र आलेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील ही पहिलीच भेट नाही. काही कौटुंबिक कार्यक्रमातही हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेसाठी पवार कुटुंब एकत्रितपणे काम करते. या पूर्वी हे दोन नेते सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी तर पुण्यात साखर संघाच्या बैठकीसाठी एकत्र आले होते.
शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे नेते आहेत ते प्रत्येक कामांची माहिती घेत असतात. त्यासोबतच या दोन नेत्यामध्ये राजकारणापलीकडचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याशिवाय सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेसाठी पवार कुटुंब एकत्रितपणे काम करीत आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्यात चर्चा होत असते. त्यामुळे या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली असणार, अशी माहिती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.