Ajit Pawar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकीय घडामोडीना वेग येत आहे. सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत.
तर अनेक जण पक्ष बदल करून स्वत:साठी आगामी रणनीतीही आखत आहेत. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राज्यात आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत. ही शेवटी लोकशाही आहे. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी मागणी करतील ते आम्ही करायला तयार आहोत.असं ते म्हणाले आहेत. याशिवाय एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. तसेच, शरद पवारांकडून तुमच्यासाठी दरवाजा उघडा ठेवण्यात आला आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर अजित पवारांनी एकाच शब्दांत उत्तर देत विषय संपवल्याचे दिसून आले.
मुलाखतीत विचारण्यात आलेल्या, तुमचीही यात्रा सुरू आहे, तशी शरद पवारांचीही यात्रा सुरू आहे. दोघांमध्ये खूप जोरात स्पर्धा सुरू आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, नाही स्पर्धा नाही. ते, जयंत पाटील(Jayant Patil), अमोल कोल्हे हे सर्वजण मिळून त्यांना जे वाटतंय, तसं ते करत आहेत. कारण, आम्ही तर खूप वर्ष तिथं काम केलं आहे. तो पक्ष जसा सुरू झाला तेव्हापासून मी त्यात होतो. तेव्हापासून मला सगळं माहीत आहे. ते आता त्यांच्या हिशोबाने पुढे जात आहेत, मी माझ्या हिशोबाने पुढे जात आहे. शेवटी निर्णय घेणं तर मतदारांचं काम आहे.
यानंतर शरद पवारांना(Sharad Pawar) विचारलं गेलं होतं, की अजित पवार परत येतील का? तर त्यांनी म्हटलं होतं की पक्ष ठरवेल. अशावेळी तुम्हाला वाटतं का त्यांच्याकडून ते निमंत्रण देत नाहीत परंतु दरवाजा उघडा आहे? असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा यावर अजित पवारांनी 'नो कॉमेंट्स' म्हणत एकाच शब्दांत विषय संपवला.
तसेच पुढे आणि तुम्ही काय समजता? अशी विचारणा झाल्यावर अजित पवारांनी सांगितलं , 'मी म्हणालो ना मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मीच अर्थसंकल्पात चांगल्या चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही सत्तेत आल्यापासून काय विकास कामे केली आहेत, त्याबाबत लोकांना सांगत आहोत. मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून जे काही थोडंफार बाकी राहिलं आणि त्यामुळेच आमचा मतदार थोड्याफार प्रमाणात आमच्यासोबत आला नाही. तर त्या मतदारांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत.'
याशिवाय विधानसभा निवडणुकीसाठी(Vidhan Sabha Election) आता फार काळ शिल्लक नाही, तुम्हाला काय वाटतं बहुमताचा आकडा तुम्ही गाठू शकाल का? असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा अजित पवार म्हणाले, 'मला असं वाटतं की महायुतीच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहोत. त्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळायला हवं, हा महायुतीमधील सर्वांचा प्रयत्न आहे. बाकी मतदारांचा तो अधिकार आहे. आम्ही मतदारांना हे पटवून देत आहोत, यासाठी आम्ही कामही सुरू केलं आहे.
आम्ही जन सन्मान यात्राही काढली आहे. आम्ही आमचं काम सुरू केलं आहे, तसं विरोधकांनीही त्यांचं काम सुरू केलं आहे. प्रत्येकजण आपलं काम करेल, महाराष्ट्राताली जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील मतदानच त्याबाबत अंतिम निर्णय़ घेईल.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.