Ncp News : शिरूर लोकसभेत 2019 मध्येही शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आले. त्यावेळी मी येथून खासदार झालो. आताही शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांना आव्हान देण्यात आले आहे. यावेळी सुद्धा आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवणार यात शंका नाही.
दिल्लीतून गुबूगुबू म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार निवडून द्यायचे की तुमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे खासदार म्हणून निवडून द्यायचे हे तुम्ही ठरवा. पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं, त्यांच्यासोबत निष्ठेने वागणं महत्त्वाचे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
मंत्री दिलीप वळसे पाटील हे आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेले. मात्र, बुधवारी (21 फेब्रुवारी) दिलीप वळसे पाटलांविरोधात शरद पवार गटाची तोफ धडाडली. बुधवारी थेट वळसेंच्या मतदारसंघात पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. याच सभेतून अजित पवारांकडून शरद पवारांवर केल्या जात असलेल्या आरोपांचा खासदार कोल्हे यांनी समाचार घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. अनेक वार छाताडावर झेलले, त्यातील प्रत्येकजण छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळे अनेकांना वाटतं की पोटी जन्माला येणे गरजेचं आहे. अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं. निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचे असल्याचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या सभेतून टीका केली, मुळात आपला पक्ष म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळं तर दिल्ली सुद्धा या नावाला घाबरून असते. त्यांचे डाव आम्ही पाहिले आहेत. ते काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही.
वस्ताद एक डाव मागे ठेवतात, त्यामुळे पवार साहेबांनी शेवटचा एक डाव मागे ठेवला आहे, जो त्या सर्वांना चितपट करेल यात शंका नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. त्यासोबतच यावेळी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ही टीका केली.