

Aamravti News : अमरावती शिक्षक मतदारसंघात 23 ऑक्टोबरला 91.08 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे वाढलेले हे मतदान हे कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे 27 ऑक्टोबरला होणार असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे त्याचा फटका सर्वच प्रमुख पक्षांना बसणार आहे. दुसरीकडे मात्र 1983-84 मध्ये अमरावती विभाग स्वतंत्र शिक्षक मतदारसंघ झाल्यापासूनच्या इतिहास पहिला तर पहिल्या पसंतीच्या मताच्या कोट्यावर कोणालाच विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे उद्या होत असलेल्या मतमोजणीवेळी दुसऱ्या पसंतीमध्ये कुणाचा 'गेम' होणार? याची उत्सुकता लागली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाचा इतिहास पहिला तर कोणत्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीत 50 टक्के कोटा निश्चित करून विजय मिळवता आलेला नाही. 2014 साली झालेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी विजय मिळवला होता. त्या विजयाचा फैसला पहिल्या फेरीत झाला नव्हता. दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतांमध्येच वसंतराव खोटरेंचा त्यांनी पराभव केला होता.
2020 साली 25 व्या फेरीमध्ये लागला निकाल
2020 च्या अमरावती मतदारसंघातील निवडणुकीत एक-दोन नव्हे, तर तब्बल दुसऱ्या पसंतीच्या 25 फेऱ्या मोजाव्या लागल्या होत्या. त्यानंतरच अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय निश्चित केला होता. त्यांनी या निवणुकीत माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता.
निकालापूर्वीच उत्सुकता शिगेला
अमरावती शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघातून 26 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदारांची संख्या 35 हजार 810 असून त्यापैकी 32 हजार 616 मतदारांनी मतदान केले आहे. सर्व मते वैध ठरली, तर विजयासाठीचा पहिल्या पसंतीचा कोटा साधारणपणे 16 हजार 300 मते असणार आहे. त्यामुळे सर्व मतदान 16 हजारांहून अधिक पहिल्या पसंतीची मते कोणत्याही एका उमेदवाराला पहिल्याच फेरीत मिळणे अशक्यप्राय मानले जात आहे.
दुसऱ्या पसंतीची मतेच ठरविणार 'आमदार'
सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांना एकापाठोपाठ एक बाद करून त्यांच्या मतपत्रिकांवरील 'दुसऱ्या क्रमांकाची पसंत' मोजली जातील. त्यामुळे 2024 व 2020 च्या निवडणुकीप्रमाणेच त्यावेळेसही हा थरार 25 ते 30 फेऱ्यांपर्यंत ताणला जाऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता लागली आहे.
प्रस्थापितांचे धाबे दणाणले
या मतदारसंघात 91% पेक्षा जास्त मतदान जाहले आहे. त्यामुळे शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मत नोंदवले आहे. इतिहास असा सांगतो की, जेव्हा जेव्हा शिक्षक मतदारसंघात मतदानाचा टक्का प्रचंड वाढतो, तेव्हा ते सत्ताधारी किंवा विद्यमान आमदारांविरोधात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आमदार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या अदिती पोहरे यांच्या पाठीमागे मोठ्या शिक्षण संस्थांचे नेटवर्क उभे असल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
मोठ्या दिग्गजांचा 'गेम' होणार
माजी आमदार श्रीकांत जोशी, भाजपच्या (BJP) संगीता बोडे, चंद्रशेखर भोयर, सुमित पवार व उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे उमेदवार दत्तात्रय लहाने यांचे बंड कोणच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता लागली आहे. त्याशिवाय शिक्षक संघटना ऐनवेळी कोणाच्या पदरात मत टाकणार याची उत्सुकता लागली आहे. स्थानिक पातळीवर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या दिलीप कडू, डॉ.अविनाश बोर्डे, प्रा. डॉ. प्रशांत विघे या शिक्षक संघटनेशी संबंधित उमेदवारांनी 'दुसऱ्या पसंतीची मते' निश्चित करण्यात बाजी मारल्यास मोठ्या दिग्गजांचा 'गेम' होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.