IPS Ankush Shinde Transfer : कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी अंकुश शिंदे यांची दुसऱ्यांदा तडकाफडकी बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी नाशिकच्या आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती केली. संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलिस सहआयुक्त होते. विशेष म्हणजे अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असतानाही त्यांची तडकाफडकी बदली केली होती. आताही नाशिकचा दोन वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची अकरा महिन्यांतच गृहविभागाने बदली केली.
नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कारकिर्दीत नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्सप्रकरणी मुंबई, पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये कारवाई केली. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. त्या ठिकाणी पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली.
अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिक पोलिस आयुक्तालयाची जबाबदारी 13 डिसेंबर 2022 रोजी दिली होती. त्या आधीचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची नऊ महिन्यांतच बदली केली होती. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांची बदली करून त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती केली होती. मात्र, अंकुश शिंदे यांचीदेखील अकरा महिन्यांतच बदली केली आहे.
संदीप कर्णिक आले होते मावळ गोळीबार प्रकरणी चर्चेत
नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या संदीप कर्णिक यांची पुण्यातील या आधीची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक असताना संदीप कर्णिक यांनी मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या या गोळीबारात एका महिलेसह तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 14 शेतकरी जखमी झाले होते. संदीप कर्णिक हे इलेक्ट्रिकल इंजिनियर पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर 2004 च्या बॅचचे आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) अधिकारी आहेत. मुंबईत त्यांनी अपर आयुक्त म्हणून कर्तव्य बजाविले आहे. सध्या ते पुणे आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून काम पाहत होते. आता ते नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
(Edited by Sachin Waghmare)