
Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा कधीही उडायला सुरवात होऊ शकते. भाजप नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असतो. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळवायचेच, यासाठी पेरणी सुरू केली आहे.
राज्यात 1 लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. याच नियुक्त्यांच्या आडून कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जिंकण्याचे 'टार्गेट' देण्याचा प्लॅन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आखला आहे.
शिर्डी (Shirdi) इथं भाजपचे महाविजय अधिवेशन झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2025 वर्षे हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचे वर्ष असेल, असे म्हटले होते. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका तसेच राज्यातील 27 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावर्षी होतील. यात काही हजार कार्यकर्ते, तिसऱ्या आणि चौथ्या फळीतील नेते, कार्यकर्त्यांना लढविले जाईल, तरीही हजारो कार्यकर्ते पदांविनाच राहतील. त्यांची सोय करण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे.
राज्यात महायुती (Mahayuti) सरकारकडून 1 लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. भाजपला त्यातील 60 टक्के, तर मित्रपक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 20 टक्के पदे दिली जातील, अशी माहिती आहे. हिशोब पाहिल्यास, भाजपचे जवळपास लाखावर कार्यकर्ते 'एसईओ' होतील, असे दिसते.
'एसईओं'च्या नियुक्तीचे अधिकार महसूल खात्याला आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हे खाते आहे. विविध प्रकारची प्रमाणपत्रे साक्षांकित करण्याचे अधिकार 'एसईओं'ना पूर्वी होते. त्यामुळे त्यांना फार भाव होता. काही वर्षापासून प्रमाणपत्रे स्वसाक्षांकित
करण्याची पद्धत सरकारने आणली आणि 'एसईओं'चे महत्त्व संपले, ते केवळ नामधारी राहिले. पण गेल्या आठवड्यात महसूल विभागाने 'जीआर' काढून त्यांचे महत्त्व वाढविले आहे. आता या 'एसईओं'ना ग्रामसभेचे आमंत्रित सदस्य बनविण्यासह शहरी आणि ग्रामीण भागातील 'एसईओं'ना आणखी काही अधिकार दिले जाणार आहेत. त्यामुळे आता 'एसईओ' होण्यासाठीही स्पर्धा असेल. ती सर्वाधिक भाजपमध्ये असणार आहे.
महिनाभरात 'एसईओ'च्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते करायचे. आता या कार्यकर्त्यांना 'एसईओ' करत रूबाब वाढवला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पदांचे टॉनिक मिळणार आहे. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री नेमले गेले आहेत. त्यामुळे तिथं जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यांना एक हक्काचा माणूस, नेता मिळाला आहे. सत्तेचा उपयोग पक्षासाठी कसा करून घ्यायचा, याची पद्धतशीर आखणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.