

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मराठवाड्यात मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. या विशेष मोहिमेत संशयास्पद हालचाली आणि सोशल मीडियाद्वारे दहशतवादी घटकांशी संपर्क असल्याच्या संशयावरून अनेक व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
ATS च्या पथकांनी जवळपास 150 ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान संशयितांच्या मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे. तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या काही व्यक्तींचे संबंध पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि गँगस्टर शहजाद भट्टीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपासादरम्यान शहजाद भट्टीशी विविध ऑनलाइन माध्यमांतून संपर्क साधणाऱ्या व्यक्तींची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने राज्यातील विविध भागांतून सुमारे 100 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात मराठवाड्यातील काही भागांचे कनेक्शन अधिक ठळकपणे समोर येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत 16 संशयितांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. यापैकी काहींना पुढील चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील ATS कार्यालयात नेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित व्यक्तींवर गुप्तपणे पाळत ठेवण्यात येत होती. त्यातून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शहजाद भट्टीच्या युजर आयडीशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या 14 जणांचा शोध सुरू असून तपास युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि चौकशीचे निष्कर्ष पुढील काही तासांत किंवा दिवसांत समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ATS च्या या धडक कारवाईमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.