Ahmednagar News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसनं चव्हाण कुटुंबियांना काय काय दिले, हे सांगत त्यांचा हा निर्णय दुर्दैवी ठरणार असल्याचं म्हटलं. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांना व्हीप बजावण्याबाबत तो कायदेशीर भाग आहे. योग्यपद्धतीने त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगून भाजपच्या ऑपरेशन लोटसवर जनताच नाराज असल्याचीही टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. Ashok Chavan Resignation
अशोक चव्हाण यांनी सोमवारी ( 12 फेब्रुवारी ) पक्षाच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर आपली भूमिका दोन दिवसांत जाहीर करू, असे सांगितले असले, तरी मंगळवारी दुपारीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरातांनी ( Basalaheb Thorat ) भूमिका मांडली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बाळासाहेब थोरात म्हणाले, "अशोक चव्हाणांचा हा निर्णय दुर्दैवी आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वडील आणि ते दोघेही मुख्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये काम करताना त्यांना चांगली आणि देशपातळीवर संधी देण्यात आली. यानंतर देखील त्यांनी असा निर्णय का घेतला याची खंत आहे आणि समजलेले देखील नाही. महाराष्ट्राच्या जनतेला भाजपचे हे पटलेले नाही".
"राज्यसभेची निवडणूक काळजीपूर्वक लढवण्याची तयारी करणार आहोत. तसेच, लोकसभेची निवडणूक मित्रपक्षांनी एकत्र घेऊन लढवणार आहोत. यात आम्ही आणि मित्रपक्ष भाजपविरोधात चांगली कामगिरी करणार हे निश्चित," असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला.
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना व्हीप बजावण्यात येणार का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले, "हा कायदेशीर भाग आहे. यावर योग्यपद्धतीने निर्णय घेऊ. तसेच, काँग्रेसमधील बहुतांशी आमदार आमच्या संपर्कात आहेत."
अशोक चव्हाण यांच्याबरोबर अनेक आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. तसेच राज्यातील काही पदाधिकारी देखील जातील, असे सांगितले जात होते. यावर बाळासाहेब थोरातांनी म्हटलं, "या अफवा आहेत. अफवेच्या माध्यमातून चाचपणी करणे हा, भाजपच्या ऑपरेशन लोट्सचा भाग आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपचे हे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्रासह देशातील जनता भाजपच्या या उद्योगाला वैतागली आहे."
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.