
भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले. कोणताही राजकीय वारसा नसलेले शिवाजी कर्डिले यांनी विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातून पाच वेळा प्रतिनिधीत्व केलं. त्यांचे नात्यागोत्यांचं, म्हणजेच सोयरिकीचं राजकारण नेहमीच चर्चेत राहिलं. दुधवाला ते मंत्रिपदापर्यंत त्यांच्या राजकीय प्रवासाचे किस्से, त्यांच्या निधनानं कार्यकर्ते पु्न्हा उजाळा देऊ लागले आहेत.
दुधवाला सरपंच ते मुंबईतील विधिमंडळ, असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. एक दुधवाला, ग्रामस्थांच्या अडचणी सोडवता-सोडवता, आमदार झाला अन् पुढं मंत्रिपदावर देखील विराजमान झाला. राजकीय प्रवासात विरोधांना नेहमीच कात्रजचा घाट दाखवणारे, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधनं झालं. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी या बातमीनं जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर इथले शिवाजी कर्डिले यांचा मूळ व्यवसाय दूध विक्रीचा होता. गावचे सरपंच म्हणून, कारभार संभाळताना, ते स्वतः दुधाचे रतीब घालायचे. या दुधवाल्याचा पेहराव एकदम साधा होता. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा कुर्ता-पायजमा, साधी चप्पल, माथी वारकरी टिळा, असायचा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यासह पोलिस अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत ते दुधाचं रतीब घालायचे. यातून त्यांचा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क आला. या ओळखीतून ते गावातील आडल्यांची छोटी-मोठं कामं मार्गी लावू लागले.
या दुधवाल्याकडून कामं मार्गी लागतात, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली. कोणतंही काम असलं की, दुधवाल्याकडे, म्हणजे शिवाजी कर्डिले ग्रामस्थं धाव घेऊ लागले. यातून शिवाजी कर्डिले यांचा जनसंपर्क वाढला. गावाबरोबर आजूबाजूच्या पंचक्रोशीत शिवाजी कर्डिले कामं मार्गी लावतात, अशा चर्चा होऊ लागल्या. यातून शिवाजी कर्डिले यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली. सरपंच असल्यानं काम कशी मार्गी लावायची, कसा पाठपुरावा करायचा, याचा अनुभव होताच.
प्रशासनातील अधिकारी देखील आपल्या घरचा दुधवाला म्हणून कामं मार्गी लावायचे. विशेष म्हणजे, काम मार्गी लागण्याचा पाठपुराव्यापासून ते, पूर्ण झाल्यानंतर त्याचे आभारापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना शिवाजी कर्डिलेंकडून आवर्जुन रिप्लाय जायचा. यातून शिवाजी कर्डिले यांच्या कामाची पद्धत अधिकच चर्चेत आली आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. शिवाजी कर्डिले यांची दुधवाल्यांमध्ये देखील, आपला माणूस म्हणून चर्चा असायचीच. पुढं-पुढं प्रशासकीय अधिकारी देखील शिवाजी कर्डिले यांचे काम म्हटल्यावर, शेतकऱ्यांची कामं म्हटल्यावर मार्गी लावण्यासाठी मदत करायचे.
यातून शिवाजी कर्डिले यांनी पुढे थेट आमदारकीपर्यंत मजल मारली. आपला दुधवाला म्हटल्यावर पंचक्रोशीतील लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवाजी कर्डिले यांना बळ दिलं. त्यावेळी नगर-नेवासा विधानसभा मतदारसंघ होता. 1995 त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली. तिथं एकहात्ती विजय मिळवला. तोच कित्ता त्यांनी पुढे 1999 गिरवला. दोन वेळा ते अपक्ष आमदार राहिले. शिवसेनेला त्यांनी या काळात बाहेरून पाठिंबा दिला. पुढे ते राज्यमंत्री झाले. त्यांना मत्स्य व बंदरे विकास खाते मिळाले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा राजकीय प्रवास पुढे भाजपपर्यंत जाऊन पोहोचला. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता भाजपमध्ये असले, तरी आपला दुधवाला म्हणून त्यांची प्रतिमा तशीच होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगर-नेवासा मतदारसंघातून आमदार झाले. याच काळात त्यांनी सहकारानं खुणावलं. ते 2007 मध्ये जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाले. 2008-09 जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. 2009मध्ये लोकसभेसाठी त्यांनी नशीब आजमावलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवताना त्यांनी त्यावेळी भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी आणि दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांच्याशी लढत दिली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
निवडणूक आयोगाकडून पुढे विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली. यात नगर-नेवासा मतदारसंघाचं विभाजन झाले. हा मतदारसंघासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता. यातून राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. 2009 मध्ये शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 आणि 2014 पर्यंत त्यांनी आमदारकीची बाजी मारली. मात्र 2019 मध्ये त्यांचा राहुरीचे प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला.
भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महायुतीची सत्ता येताच, जिल्हा सहकारी बँकेत सत्तांतर घडवले. शिवाजी कर्डिले यांना 2023 मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन केलं. आता 2024 मधील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात अतिशय सूक्ष्म नियोजन करून, कर्डिले यांनी विजय मिळवला. सहा वेळा आमदारकी लढवताना, शिवाजी कर्डिले यांचा 2019मध्ये एकदाच पराभव झाले. तर लोकसभा लढवताना, 2009 मध्ये पराभव झाला.
शिवाजी कर्डिले कोणत्याही पराभवानं खचले नाहीत. त्यांच्या यशाचं गणित जनसंपर्कात होते, असे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात. प्रशासकीय काम करून घेण्याची हातोटी होती. त्यांनी राजकारण करताना, विरोधांना कधीही टार्गेट करत राहिले नाहीत. परंतु विरोधकांना कायम शह देत राहिले. विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी, त्यांचा जनसंपर्क फायदा ठरायचा. हा जनसंपर्क त्यांच्या सरपंच काळापासूनचा होता. मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते नावाने ओळखणारे कार्यकर्त्यांची फौज होती.
कार्यकर्त्यांची, ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यासाठी शिवाजी कर्डिले यांचा रोज सकाळी निवासस्थानी 'जनता दरबार' व्हायचा. या 'जनता दरबारा'ची पद्धत त्यांच्या पहिल्या आमदारकीपासून सुरू होती, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तो कालपर्यंत सुरू होता. मध्यंतरी त्यांचे आजारपण उफाळलं होतं. उपाचारानंतर त्यांना डॉक्टरांना पूर्ण आराम सांगितला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची उपचारा दरम्यान भेट घेऊन, आरामाचा सल्ला दिला होता. निवासस्थानी दाखल होताच, सुरूवातीचे काही दिवस आरामानंतर पुन्हा 'जनता दरबार' सुरू झाले होते.
दिवाळी पाडव्याला त्यांच्या निवासस्थानी फराळचा कार्यक्रम व्हायचा. यावेळी देखील त्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला जिल्हासह राज्यभरातील प्रमुख नेते, प्रशासनातील अधिकारी, जुने-जाणते कार्यकर्ते, नातेवाईकांना आमंत्रित केलं जातचे. हा फराळचा कार्यक्रम त्यांनी एखादा अपवाद वगळता कधी खंड पडू दिला नाही. धोंड्याच्या महिन्यात देखील, ते मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नातेवाईकांना बोलावून जेवणाचा कार्यक्रम करायचे. आता त्यांच्या जाण्याने, अशा त्यांच्या जुन्या आठवणींना कार्यकर्ते,पदाधिकारी आणि नातेवाईक उजाळा देऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.