नवी दिल्ली : केंद्रात गेली ७ वर्षे सत्तारूढ असलेलया भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आगामी दिवाळीनंतर ७ नोव्हेंबरच्या आसपास लखनौ किंवा दिल्लीत होणार हे जवळपास निश्चित आहे. उत्तर प्रदेशासह ५ राज्यांतील रणधुमाळी व शेतकरी आंदोलन, लखिमपूर खेरी शेतकरी हत्याकांडातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची सक्रिय भूमिका, प्रचंड वाढलेली बेरोजगारी व आवाक्याबाहेर जाणारा महागाईचा भडका या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरातील पक्षनेत्यांना आणखी एक मंत्र यात मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. विधानसभा निवडणुका या मिनी लोकसभा निवडणुका मानल्या जात आहेत.
भाजपच्या कार्यालयीन प्रमुखांची (ऑफीस बेअरर्स) राष्ट्रीय बैठक येत्या सोमवारी (ता. १८ ऑक्टोबर) दिल्लीत बोलावण्यात आली आहे. सामान्यतः ही बैठक पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एक दिवस आधी घेतली जाते. मात्र, यंदा कोरोना वातावरणामुळे ही बैठक महिनाभर आधीच होणार आहे व दिवाळीनंतर ७ तारखेच्या आसपास राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होईल. ती दिल्ली किंवा लखनौत होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील टीमची ७ ऑक्टोबरला फेररचना केल्यावर होणारी ही पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक असल्याने ती पक्षसंघटनेच्या दृष्टीने महत्वाची असेल.
भाजपच्या संकेतानुसार ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते. आगामी वर्षाच्या सुरवातीलाच उत्तर प्रदेशासह ५ राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. मात्र, भाजपसह अन्य पक्षांसाठीही उत्तर प्रदेशाचे महत्व स्वाभाविकपणे अनन्यसाधारण आहे. भाजपला गोव्यासारख्या राज्यात आशा आहे. मात्र, पंजाब व उत्तराखंडमध्ये पक्षाची स्थिती बिकट असल्याचे उघड आहे. या राज्यात यापूर्वी २०१६ मध्ये अलाहाबाद येथे भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली होती. सोमवारी (ता.१८ऑक्टोबर) होणाऱ्या राष्ट्रीय कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत येणारे फीडबॅक आगामी कार्यकारिणी बैठकीतील मुद्दे निश्चित करण्यासाठी भाजप नेतृत्वाला महत्वाचे ठरणार आहेत. ८० जणांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व त्यापेक्षा दुपटीहून जास्त सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची उपस्थिती आगामी बैठकीत असणार आहे.
२०१४ नंतर मोदीयुगातील भाजपला सत्तेचा अहंकार व स्वपक्षीय नेत्यांकडूनही टीका सहन न होणारी टोकाची असहिष्णुता यांनी ग्रासले असल्याची टीका विरोधकांकडून होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मते विरोधकांची हताशा व निराशा यातूनच मोदी यांच्या नेतृत्वावर अशी टीका होते. कोरोनामुळे दिर्घकाळानंतर प्रत्यक्ष होणाऱ्या आगामी कार्यकारिणीच्या निमित्ताने भाजप या मुद्यावर मोदी-शहा विरोधकांना पुन्हा उत्तर देईल असे मानले जाते. राजकीय विश्लेषक सईद अंसारी म्हणतात की भाजप नेतृत्वावर (मोदी-शहा) होणारे आरोप नवीन नाहीत. मात्र साऱ्या आरोपांना पुरून भाजपचा अश्वमेध अग्रेसर आहे. दुसरीकडे लोकसभेत सातत्त्याने ५० जागांच्या आसपास घसरण झालेल्या कॉंग्रेसला, पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार याचे उत्तर माहिती असूनही ते तत्काळ देता येत नाही अशी स्थिती आहे. येथेच दोन्ही पक्षांतील नेतृत्वाच्या कणखरपणाचा विषय स्पष्ट होतो असेही निरीक्षण अंसारी यांनी नोंदविले.
मिश्रा म्हणणार इदम् न मम ?
उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे. त्यातच लखीमपूर खेरी प्रकरणाने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पक्षाची डोकेदुखी आणखी वाढविली आहे. चार शेतकऱयांना चिरडणारे त्यांचे पुत्र आशीष याला उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने कण्हत कुथत अटक केल्यावर आता मंत्री मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात आहे. मात्र, भाजप सूत्रांच्या मते विरोधकांनी मागणी केली व केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला असे प्रसंग मोदी राजवटीत अत्यंत अल्प आहेत. यापूर्वी बलात्काराचे आरोप असणारे राजस्थानचे मंत्री निहालचंद यांच्या राजीनाम्यावरूनही विरोधकांनी मोठा आवाज उठविला होता. त्यावेळीही मोदींनी निहाल सिंह यांचा राजीनामा तत्काळ घेतला नव्हता पण त्यांचे अधिकार काढण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जोवर विरोधकांकडून मागणी होणे बंद झाले की मिश्रा स्वतःच केंद्रीय मंत्रीपद सोडतील अशी शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.