
Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे, असे वाटत असताना विधानसभा निवडणुकीत भाजपने याठिकाणी अभूतपूर्व असे यश मिळवत आघाडीचा सुफडासाफ केला. दुसरीकडे हरियाणामधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असे वाटत असताना भाजपने या ठिकाणी विजय मिळवला. या दोन्ही राज्यात भाजपला मोठे यश मिळाले. महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुठल्या मॅजिकमुळे भाजपचा विजय झाला हे जाणून घेण्यासाठी निवडणुकीनंतर सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये भाजपच्या विजयामागे कुठला फॅक्टर होता, याचे नेमके कारण समोर आले आहे. (Mahayuti News)
महाराष्ट्र आणि हरियाणातील विजयावर मॅट्रिक्सकडून सर्व्हे करून अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या विधानसभा निवडणुकीत पीएम नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) प्रभाव आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधकांची आघाडी भाजपला लढत देण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. हा सर्व्हे 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणात करण्यात आला. या सर्व्हेसाठी महाराष्ट्रातून 76 हजार 830 आणि हरियाणातून 53 हजार 647 सँपल घेण्यात आले होते.
भाजप (Bjp) संविधान बदलणार असल्याचा आणि आरक्षण घालवणार असल्याचा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला. पण महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेत काँग्रेसचा हा नरेटिव्ह बिलकूल चालला नाही. दोन्ही राज्यात भाजपचे मुख्यमंत्री बसले. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत दयनीय पराभव झाला. राहुल गांधी यांचा संविधान बदलण्याचा मुद्दा अजिबात चालला नाही. याबाबतचा मॅट्रिक्सने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीत मोदी मॅजिकच चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचा विजय झाल्याचे मॅट्रिकच्या सर्व्हेतून पुढे आले आहे.
नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा झाला फायदा
लोकसभा निवडणुकीत भाजपला भलेही 240 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फटका बसला होता. मात्र, या सर्व्हेतून महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा भाजपला फायदा झाला आहे. त्यांची लोकप्रियता कायम असल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे. महाराष्ट्रात 55 टक्के नागरिकांमध्ये मोदींचे मॅजिक कायम असल्याचे दिसले तर हरियाणात 53 टक्के मतदारांमध्ये मोदींची जादू कायम दिसत आहे.
काँग्रेसला बसला फटका
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. महाराष्ट्रात एका जागेवरून 14 जागेवर यश मिळाले पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीतील स्क्रिप्ट विधानसभा निवडणुकीत चालली नाही. 400 पारचा नारा देणारी भाजप संविधान बदलणार आहे. त्यासाठीच त्यांना एवढ्या जागा हव्या आहेत, असा प्रचार काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत केला होता. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीत या प्रचाराचा काहीच परिणाम झाला नाही. या निवडणुकीत शेती आणि पहिलवानांचे मुद्देही प्रभावीपणे मांडण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणातील नागरिकांचा राहुल गांधींवर फारसा विश्वास राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विश्वासू आणि पर्यायी चेहरा देण्यात विरोधक अपयशी ठरले. त्यामुळेही विरोधकांचा मोठा पराभव झाला. याशिवाय मतदारांमध्ये काँग्रेसबाबत संशय होता. मोदींच्या प्रभावापुढे राहुल गांधी टिकू शकले नाहीत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडता आले नसल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट दिसले.
विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 'एक है तो सेफ है' चा नारा महाराष्ट्र आणि हरियाणात दिला होता. त्याला मतदारातून मोठा पाठिंबा मिळाला. मोदींच्या नेतृत्वातील स्थिरता, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकासावरही जोर देण्यात आला. या उलट काँग्रेसच्या नेत्यांची बेताल वक्तव्य , दिशाहीन मुद्दे, अंतर्गत कलह यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान झाल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.