Bjp News : आगामी काळात राज्यसभेच्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुतीच्या वाट्याला पाच, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे.
महायुतीमध्ये भाजपकडे तीन, शिवसेना शिंदे गट एक, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे एक जागा येणार आहे. आघाडीतील एक जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. भाजपच्या तीन जागांसाठी नऊ जणांच्या नावांची यादी दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात अली आहे. त्यापैकी तीन नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन तर काँग्रेसचे कुमार केतकर, ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यात भाजपचे तीन खासदार होते. आता सहापैकी तीन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात. त्यामुळे या तीन जागांसाठी नऊ नावे भाजपकडून निश्चित केली आहेत. ही यादी दिल्ली पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी महाराष्ट्र भाजपची बैठक झाली. त्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसाठी नऊ जणांची नावे फायनल करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. या नऊपैकी तीन जणांची नावे निश्चित होणार आहेत.
बिहारमध्ये नुकतीच सत्तापरिवर्तन घडवून आणण्यात विनोद तावडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. यामुळे त्यांना राज्यसभेचे बक्षीस दिले जाणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजप श्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
या तीन उमेदवारांपैकी एक चेहरा मराठा, एक ओबीसी तर एक बिगर मराठा व बिगर ओबीसी चेहरा निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एक महिला उमेदवार असणार आहे. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे, विजया रहाटकर, चित्रा वाघ यांच्यापैकी एक जणाची वर्णी लागणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या निवडणुकीत भाजप स्वबळावर दोन जागा निवडून आणू शकते. तिसऱ्या जागेसाठी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आहे, तर चौथी जागा लढायची ठरली तर महाविकास आघाडीची मते फोडावी लागणार आहेत.
सध्या भाजप तीन, अजित पवार (Ajit pawar) यांची राष्ट्रवादी एक आणि एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांची शिवसेना एक अशी निवडणूक होऊ शकते. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो; परंतु भाजपचे लक्ष्य चौथ्या जागेवर आहे. या जागेसाठी वरिष्ठांशी चर्चा महाराष्ट्रातील नेते करत आहेत. त्यामुळे या जागेसाठी उमेदवार उतरवणार, की निवडणूक बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले आहे.
R