मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या निकालावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सामनातील सदरातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत हरामाचा पैसा वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. आणि याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे ‘कॅश’ म्हणजे रोखीची चणचण भासली व फडणवीस यांना तेच हवे होते. हे खरे असले तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकांत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पक्षाने बजावली. मुख्यमंत्र्यांनी 40 हजार कोटींची कामे थांबवली ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा पैसा पसरला आहे. याच पैशांनी ‘मतदार’ विकत घेतला जातो. हे सर्व भयंकर आहे. नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत. मग आता राहिले काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.