Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra PoliticalNews : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे. यासह आज शुक्रवार २३ जानेवारी रोजीच्या विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Live Update 1
Live Update 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur: हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानं खासदार धानोरकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा गट स्थापन

काँग्रेसकडून प्रदेशाअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने खासदार प्रतिभा धानोरक यांचा नेतृत्वाखाली काँग्रेस गट स्थापन करत असल्याचा दावा धानोरकर गटाकडून केला जात आहे. यात धानोरकर गटनेता निवडला गेला आहे. त्यामुळं अजूनही काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस संपलेली दिसत नाहीए. विशेष म्हणजे यात धानोरकर गटाचे 13 नगरसेवक आले आहेत. मात्र विजय वडेट्टीवार गटाची काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. त्यामुळं विजय वडेट्टीवार यांच्याही गटाचे नगरसेवकही वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळं विभागीय आयुक्त कार्यालयाकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

झेडपीच्या शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी ३ आणि ४ फेब्रुवारीला होणार परीक्षा

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" ही परीक्षा येत्या तीन आणि चार फेब्रुवारीला ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

ही परीक्षा प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजित केली आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थींच्या लॉगिनमध्ये लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तरी परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.

BJp : काँग्रेस-शिवसेना शिंदें गटाची 'शहर विकास आघाडी’ स्थापन

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असली, तरी विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवकांनी एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या घडामोडीमुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

bjp News : वरवडे पंचायत समितीमधून भाजपचे सोनू सावंत बिनविरोध

पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला कणकवली तालुक्यात दुसरा मोठा धक्का बसला आहे. वरवडे पंचायत समितीमधून भाजपाचे सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमदेवार सुधीर सावंत आणि मनसेचे उमेदवार शांताराम साद्ये यांनी निवडणुकीतून माघार घेतली, या माघारीचा थेट फयदा हा भाजपला झाला असून, भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं हा शिवसेा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. या मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारानं देखील माघार घेतली आहे.

Rohit Patil : लग्नाचा विषय काढताच आमदार रोहित पाटील म्हणाले ‘आधी लगीन कोंढण्याचं....’

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी विरोधकांसमोर शड्डू ठोकला आहे. मात्र, याच निवडणुकीच्या धामधुमीत आमदार रोहित पाटील यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यावर रोहित पाटील यांनी आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत त्यापासून स्वतःची सुटका करून घेतली आहे.

Mahad Political Crime : सकाळी गोगावलेंचे पुत्र पोलिस ठाण्यात हजर, तर दुपारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरण

महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. त्यात मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र आणि पुतण्याचा समावेश होता. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता, उच्च न्यायालयाने गुरुवारी ठणकावताच सकाळी मंत्री गोगावलेंचे पुत्र पोलिस ठाण्यात हजर झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीचे चार पदाधिकारी पोलिसांना शरण आले आहेत.

SHIVSENA NEWS : राजकारणात लवचिकता असावी. मात्र, त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही, याची काळजी असावी : पेडणेकर

राज ठाकरे यांच्याकडून राजकारणात लवचिक धोरणाबाबत सूचक विधान करण्यात आले आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे. राजकारणात लवचिकता असावी. मात्र, त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही, याची काळजी असावी, असे भाष्य केले आहे.

Sanjay Upadhyay : मुंबईचा महापौर बाळासाहेबांच्या मनातीलच होईल : भाजप आमदार उपाध्ये

बाळासाहेबांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विसरला पडला होता, त्यामुळे त्यांची ही दुर्दशा झाली आहे. ते मुंबईला हिरवं करण्यासाठी निघाले होते. मात्र, मुंबईही भगवीच राहणार असून बाळासाहेबांचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार असून तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातीलच होणार आहे, असे भाजपचे आमदार संजय उपाध्ये यांनी स्पष्ट केले.

Shivsena UBT : जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ : ठाकरे सेनेची भूमिका

चंद्रपूर महापालिकेत जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे सध्या आठ नगरसेवक आहेत, तसेच दोन अपक्ष नगरसेवकही आमचेच आहेत. त्यामुळे जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यांच्यासोबत आम्ही युती करू असे गिरे यांनी स्पष्ट केले. सध्या आमची काँग्रेस पक्षासोबत बोलणी सुरू आहे आणि आम्ही आमची मागणी त्यांच्यासोबत ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Akola News : भाजपविरोधातील आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत; महापौरपदाचा उमेदवार लवकरच जाहीर करणार : प्रकाश आंबेडकर

अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीत दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित आणि एमआयएम हे एकत्र आले आहेत. या विरोधी आघाडीच्या वतीने लवकरच महापौरपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics Update : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना मोठा दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता, एबीसीनंतर ईडीच्या खटल्यातूनही निर्दोष मुक्तात, छगन भुजबळांचा अर्ज मंजूर

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगरचा महापौर मुंबईत ठरणार; सुजय विखे यांची माहिती

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संयुक्त बैठकीत महापौरपदासाठी योग्य उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिलांना ओटीपी न येणे, वेबसाइटवर त्रुटी येणे अशा तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करता आली नाही. परिणामी त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. आता पात्र महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्तीचा पर्याय लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Sanjay Raut News : एवढी वाईट वेळ आलेली नाही

बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो भाजपकडून केवळ राजकारणासाठी वापरले जाते. तसे नसते तर शिवसेना पक्ष फोडला नसता. मुंबईत शिंदेंचा पाठिंबा घ्यायचा की नाही, याचा निर्णय पक्ष घेईल. पण आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. त्यांचा पाठिंबा घेण्याएवढी वाईट वेळ आमच्यावर आली नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधव यांचे शिंदेंना आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आज एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या महापौर पदाबाबत आवाहन केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा न देता उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar : आव्हाडांसाठी रोहित पवार आले धावून

ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी कायम शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा जपली, पण काही दिवसांपासून MIM चा स्थानिक उमेदवार आणि त्याच्या नातेवाईकांकडून अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली जाते. निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असली खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही. मुळात निवडणूक लढण्यासाठी MIM ला फंडींग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको. निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा संबंधितांनी लोकांची कामं करावीत. आम्ही मात्र कायम आव्हाड साहेब यांच्यासोबत आहोत, अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Raigad Politics : विकास गोगावले याचे आत्मसमर्पण, इतरांचे काय? न्यायालयाने पोलिसांना पुन्हा फटकारले

महाडमधील राडाप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून पसार असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेचा विकास गोगावले याच्यासह अन्य 7 जणांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. यानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे नाना जगताप, श्रेयस जगताप, धनंजय देशमुख यांच्यासह इतर आरोपींना देखील पोलिसांनी अटक करावं, असे मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी अटक होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

NCP Update : राष्ट्रवादीचे हरिश दरोडा याचा तुरुंगात हृदयविकाराने मृत्यू

राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा याचे हृदयविकाराने तुरूंगात निधन झाले आहे. भात खरेदी घोटाळ्यात ते तुरुंगात होते. हरीश दरोडा याने आदिवासी महामंडळाच्या भात खरेदीमध्ये घोटाळा केल्या प्रकरणात दोन महिन्यांपासून तुरुंगात होते. हरिश दरोडा याला आदरवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र त्याची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी त्याला ठाणे इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Eknath Shinde Shivsena : मनसे आम्हाला मुंबईसह राज्यात पाठिंबा देईल; मंत्री प्रताप सरनाईक

'कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने पाठिंबा दिला आहे. राज्यातील इतर महापालिकांमध्ये पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटायला नको. राज ठाकरे यांचा आम्हाला नेहमीच पाठिंबा असतो, मुंबई महापालिकेत देखील आम्हाला ते पाठिंबा देतील,' असे विधान एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Beed Update : विद्यार्थिनीने अजितदादांना लिहिलेल्या पत्रानंतर त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होणार

बीडच्या परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी अंकिता अवचट हिने उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत कुठलीच व्यवस्था नसल्याचे म्हटले होते. तर सरपंचांनी सोयी सुविधांच्या नावाखाली पैसे उचलले, मात्र प्रत्यक्षात कुठलीच सुविधा नसल्याचाही आरोप केला होता. यानंतर बीड पंचायत समितीकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी दिली आहे.

Badlapur Crime : बदलापूरमधील बाल लैगिंग प्रकरणात मोठी कारवाई करणार; चंद्रशेखर बावनकुळे

बदलापूरमधील बाल लैगिंग प्रकरणाची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. यात कोणालाच सोडणार नाही, कडक कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

Buldhana Crime : दोन कंपन्यांतून 12 लाखांची रोकड लंपास...

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठी खळबळ उडवणारी धाडसी चोरी उघडकीस आली आहे. तलाव रोड परिसरात असलेल्या दोन नामांकित कंपन्यांमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री घरफोडी करत तब्बल 12 लाख रुपयांची रोकड लंपास केली.

Solapur ZP Update : भाजप उमेदवाराचे एबी फाॅर्म रद्द करण्यासाठी जिल्हाध्यक्षांचे पत्र, पण...

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत, मंद्रूप पंचायत समिती गणाच्या अर्ज छाननी वेळी नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली. भाजपतर्फे दोघांना देण्यात आलेले एबी फॉर्म, रद्द करण्यासाठी अखेरच्या क्षणी जिल्हाध्यक्षांनी पत्र दिले. मात्र, त्याच उमेदवाराचा अर्ज वेळेच्या निकषावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवला आहे. हे पत्र 21 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत देणे अपेक्षित होते. पण भाजपच्यावतीने पत्र सायंकाळी 4.46 मिनिटाने देण्यात आलं. त्यामुळे हे पत्र ग्राह्य धरता येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आपले.

Raigad Politics : मंत्री गोगावले यांचे पसार पुत्र विकास गोगावले महाड पोलिस ठाण्यात हजर...

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीत राडा झाला होता. त्यावेळी दोन गटात राडा झाला होता. परस्परविरोधात गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून विकास गोगावले पसार होते. याप्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत, पोलिसांना त्यांच्या कारवाईवरून फटकारले होते. विकास गोगावलेविरोधात कलम 307 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

Beed Crime : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

संतोष देशमुख हत्याप्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हत्या प्रकरणातील साक्षीदारांची यादी सरकारी वकील न्यायालयाकडे देणार आहेत. न्यायालयाकडून साक्षीदारांना आज नोटीस इशू होतील आणि नंतर प्रत्यक्षात साक्षीदार हजर राहतील.

राज-उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त आयोजित सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. येथे उद्धव आणि राज ठाकरे मार्गदर्शनही करणार आहेत.

अकोल्यात भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकवटले

अकोला महापालिकेत महापौरपदासाठी भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकवटले आहेत. भाजप बहुतमाच्या जवळ आहे. मात्र, विरोधी पक्षांनी एकत्र येत आपला महापौर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी बैठक पार पडली.

शिंदे शिवसेना-काँग्रेस  एकत्र

मीरा-भाईंदर महापालिकेत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून गट स्थापन केला असून त्याची नोंद विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या गटाचे गटनेते पद काँग्रेसकडे असणार आहे. या गटामुळे शिवसेनेला एक स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे.

भाजपाचे उपनगराध्यक्षांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्ष असलेल्या समीर तिवरेकर यांना नगरपरिषदेच्या इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय काळात 4 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा तिवरेकर यांचा आरोप यांना केला होता. त्यानंतर नगरपरिषदेचे इंजिनियर असलेल्या यतीराज जाधव यांच्याकडून तिवरेकर यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे,

मनसे-शिंदे शिवसेनेच्या युतीवर फडणवीस बोलणार

कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्यात युती झाली आहे. या युतीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, मी दावोसमध्ये महाराष्ट्रा झालेल्या गुंतवणुकीच्या कराराबाबत बोलेन. भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे करार झालेत त्यासंदर्भात उत्तरं देईल.

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १००वी जयंती आहे. यानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com