पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. परंतु, अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री हे सातत्याने मुस्लिम विरोधी द्वेषाचे वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद निर्माण करीत आहेत. तसेच, दादर व मुंबई मधील इतर विभागात मुस्लिम समाजाच्या फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासारख्या मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या तीन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा, असे आदेश देण्यात आले आहेत. मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा, असे म्हटले आहे. दरम्यान, सैन्य दलाच्या तीनही प्रमुखांच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह पंतप्रधानांच्या भेटीला निघाले आहेत.
आपल्याजवळ वेळ कमी आहे, लक्ष मोठं असल्याचे सूचक वक्तव्य उद्याच्या सीसीएसच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर भारत हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना देखील भीती आहे. अस्तित्वाचा प्रश्न आला तर अण्वस्त्रांचा पर्याय आहे, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावं, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा आज त्यांनी बैठकीत घेतला.
जिथे दहशतवादी हल्ला झाला तिथे एकही सैनिक नव्हता यावर कोणीच बोलत नाही. दोन शिपाई-सैनिक तिथे असते तर 28 लोकांचा मृत्यू झाला नसता. पण ही चूक केली त्याचा निषेध कोणी केला नाही. खऱ्या मुद्यापासून दूर ठेवले जात आहे, अशा शब्दात माजी आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याच्या निर्णय घेतला. पण आता 30 ते 40 वर्षांपासून येथे विवाहानंतर राहत असलेल्या महिलांना आपले कुटुंब सोडून जावे लागत आहेत. यावरून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी, अशा महिलांच्याबाबात केंद्र सरकारने पुन्हा विचार करावा, असे आवाहन केलं आहे. तर गृहमंत्रालयाने घेतलेला निर्णय अनेक दशकांपासून येथे शांततेत राहणाऱ्यांसाठी अमानवीय असल्याचे म्हटलं आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यात अनेक आंदोलने झाली आहेत. पण लोकसभा निवडणुकीच्या कालावधील राज्यात या मुद्याने ढवळून काढलं होतं. पण आता हा मुद्दा बाहेर फेकला गेल्याची चर्चा होताना दिसत आहे. अशातच नवीन आकडेवारीवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला खरमरीत इशारा दिला आहे. शिंदे समितीने 8 लाख 25 हजार 851 कुणबी सर्टिफिकेट दिल्याच्या दाव्यावरून हाके यांनी टीका केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चांना उत आला आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे अन राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू, असे म्हटलं आहे. त्यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मुख्य झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियुक्त्या केल्या असून रायगडचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेसह गोगावले समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकमंत्री पदाचा निर्णय काय व्हायचा, कधी व्हायचा तो होईल. पण ध्वजारोहणाचा मान गोगावलेंनाच मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 भारतीय निरपराध पर्यटकांना प्राण गमवावे लागले. ज्याचा प्रत्येक भारतीयांच्या मनावर परिणाम झाला असून पाकिस्तानविरोधात चिड निर्माण झाली आहे. तर पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणीही केली जाते आहे. दरम्यान काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत काही विशिष्ट इलेक्ट्रिक गाड्यांना काही निवडक रस्त्यांवर टोलमुक्ती दिली जाणार आहे. तसेच प्रवासी इलेक्ट्रिक गाड्यांवर मोठं अनुदान दिलं जाणार आहे.
पहलगाम हल्ल्याचा राजकीय विषय करू नये. आमच्या भावनांशी खेळू नका. आमच्यासमोर आमचा माणूस मारला आहे. दहशतवाद्यांची स्टेटमेंट आम्ही सांगून झाली आहेत. त्यांनी बोलून आमच्या लोकांना मारलं आहे. दहशतवाद काय असतो, ते आम्ही त्याठिकाणी अनुभवला आहे. आम्ही त्यांना हात जोडले होते. ते चित्र अजूनही आमच्या डोळ्यासमोरून जात नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनी माणुसकी दाखवावी, असे आवाहन पुण्याच्या जगदाळे कुटुंबीयांनी केले आहे.
एक रुपयात पीकविमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्ज आले होते. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा अपव्यय होतो आहे. अशी षडयंत्र काही लोकांनी केली आहेत, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी सुधारित पद्धतीने पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जेणेकरून विमा कंपन्यांचा नव्हे तर शेतकऱ्यांचा लाभ व्हावा, अशी रचना नव्या विमा योजनेची असणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे राज्य सरकाडून जाहीर करण्यात आले आहे. असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद एवढ्यात सुटेल, असे वाटत नाही. रायगड आणि नाशिकचाही तिढा सुटणार नाही. उलट तो वाद आणखी वाढत जाणार आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल, असे भरत गोगावले गेली वर्षभरापासून म्हणत आहेत. मंत्रिपदासाठी त्यांना अगोदर अडीच वर्षे थांबावं लागलं. आता मंत्री झाले आहेत. पण पालकमंत्रिपदासाठी गोगावले यांना पाच वर्षे थांबावे लागेल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी भरत गोगावले यांना लगावला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार रद्द करण्यात आला. त्याचबरेाबर भारत पाकिस्तानची आणखी कोंडी करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानी विमानासाठी हवाई क्षेत्र बंद करण्याच्या विचारात भारत आहे. पूर्वेकडे जाणाऱ्या विमानांना आता चीन, श्रीलंकेला वळसा घालून जावे लागणार आहे. तसेच, व्यापारी जहाजांना बंदी करणार असल्याची माहिती आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
भाजप आणि शिवसेनेने श्रेय घेतलेल्या काश्मीर एअरलिफ्टचा सगळा खर्च शासकीय तिजोरीतून करण्यात आल्याचे समोर येत आहे. जवळपास 64 कोटींचा हा खर्च झाला आहे.
राज्य सरकार चालू आर्थिक वर्षात एक लाख 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार आहे. या कर्जासाठी शासनाने केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे परवानगी मागितली आहे. 2025-26 च्या महसुली उत्पन्नाच्या उद्दिष्टानुसार तिजोरीत दरमहा सरासरी 43 हजार कोटी रुपये जमा होत नसल्याने शासनाने हे कर्ज काढण्याचे ठरविले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याशी संबंधित कलमाडी यांच्या विरोधातील मनी लॉण्डरिंग प्रकरणातील ईडी तपास बंद झाला आहे. त्यासंबंधीचा ईडीचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील न्यायालयाने स्वीकारला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बैठकांचा धडाका लावला आहे. अशातच आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत केंद्र सरकार पाक विरोधात काही मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता फणसळकर यांच्यानंतर पुढील पोलिस आयुक्त कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलिस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे.
काँग्रेसकडून आज नाशिकमध्ये सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये दर्गा काढण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
मुंबईत काल एक मोठी आगीची घटना घडली होती. त्यानंतर आज आणखी एक आगीची घटना समोर आली आहे. वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला आज भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीच्या जळून खाक झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर या सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.