गेल्या अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र हा तिढा आता लवकरच सुटेल असे संकेत मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभानंतर त्यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. त्यांचा खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी, 'लवकरच चमत्कार होईल' असे सूचक वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी, मी देशाचा संरक्षण मंत्री आहे, त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी आपल्या सैनिकांसह देशाच्या सीमांचं रक्षण करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाला जे वाटतं आहे ते होणारच असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्यावरुन खासदार संजय राऊत यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार यांनी राजीनामा का मागितला नाही, याचं उत्तर मी कसा देणार? राऊत मोठा माणूस, त्यांच्यावर सामान्य काय बोलणार? असे ते म्हणालेत.
पुणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज (ता.4) संपन्न झाला. यावेळी त्यांनी, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, असा कानमंत्र दिला. पण आता या आदेशानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्याच पोटात गोळा आल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता.4) रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मिरकरवाडा बंदरावरील मच्छीमारांबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी राणे सिंधुदुर्गातून जातीय विद्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. ते पदाधिकाऱ्यांशी संवाद तसेच मिरकरवाडा येथील जेटीची पाहणी केल्यानंतर बोलत होते.
जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवरील जलविद्युत केंद्र असलेल्या बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहे. या धरणातून सध्या पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानसाठी सोडला जात नाही. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. आंदोलकांवर शनिवारी (ता. 03 मे) पोलिसांनी लाठीहल्ला केला. तसेच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी सुमारे 300 ते 400 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पाडेगाव परिसरातील वनस्पती उद्यानाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या वेळी उद्यानातील विविध झाडांची उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून आवर्जून माहिती घेतली. या उद्यानात मजुरी करणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे आले का सगळ्यांना अशी विचारणा केली. आठवडाभरापूर्वीच तुमचे या महिन्यांचे पैसे पाठवले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मत्सोद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे मत्सोउद्योग धोरण ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या अध्यक्षपदाचे काम प्रकृती अस्वास्थामुळे करू शकत नाही हे कारण देऊन नाईक यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक कडक पाऊल उचलेले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. सिंधू पाणी वाटप करार भारताने रद्द केला आहे. तसेच भारताच्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानच्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता बागलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबविण्यात आले आहे, त्यामुळे भारताकडून पाकिस्तानची ‘पाणीकोंडी’ करण्यात येत आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या आजीमाजी समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण करण्यात आली आहे. या राड्यात तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीसानी दोन्ही गटांनी दिलेला तक्रारीनुसार दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करत तीन जणांना अटक केली आहेत.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठांवर रिपाइं नेते सचिन खरात यांनी टीका केली आहे. दलित आणि आदिवासींचा निधी लाडकी बहिण योजनेला वळवल्यामुळं सचिन खरात संतापले. संजय शिरसाठांना मंत्रीपद सांभाळता येत नसेल, तर राजीनामा द्या, अशी मागणी सचिन खरातांनी केलीय आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्ये 100 दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् मंत्री आदिती तटकरे यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यांना 100 पैकी 80 टक्के गुण मिळाले आहे. त्यावरुन शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे. आमच्या खात्याचा निधी वर्ग करण्यात आला. मग त्यांचा नंबर वन आला. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही तर आमचा उल्लेख 100 दिवसांच्या कार्यक्रमात कसा होणार? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बारावीचा निकाल उद्या ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकतीच तशी घोषणा केली आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहाता येईल.
धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. कोर्टात त्यांनी तशी लेखी तक्रार केली आहे. तुझे 18 तुकडे करणार अशी धमकी फोनद्वारे आपल्याला धनंजय मुंडे यांनी दिली.12 दिवसांपूर्वी मला धमकी देण्यात आली आहे. असा गंभीर आरोप करुणा मुंडे-शर्मा यांनी केला आहे. अजून मी मुंडे कुटुंबाबद्दल 50 टक्के पण तोंड उघडले नाही. उघडायला लाऊ नका असंही करुणा मुंडे म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर साधुसंतांसह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून 15 मे पर्यंत निकला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या परभणीत पोखरणी ते परभणी सद्भावना यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आज दिवसभरात 20 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा आज सायंकाळी परभणीत पोहोचणार आहे
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तासोबत होणाऱ्या सर्व प्रकरचा व्यापार भारताने थांबवला आहे. तसेच पाकिस्तानवर संपूर्ण आयातबंदी लागू केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वडिल माजी आमदार अरुण काका यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले. संग्राम जगताप यांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. जगताप कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अजित पवार संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.
उद्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 57 वे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला 50 हजार एसटी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे.
आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटातून कळतोय ही बाब दुर्दैवी असून याचं आम्हाला दुःख वाटतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सांगलीत शिवोत्सव 2025 या सोहळ्यात बोलताना त्यानी हे वक्तव्य केलं. काही महिन्यापूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नवीन पीढीला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम कळला ही एकप्रकारे खेदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट देण्यात आला होता. अशातच जगभरातील भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानला साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीनंतर साई संस्थानसह पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही बैठीक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बैठक सुरु होती. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भातील परिस्थीतसह विविध मुद्यांवर चर्चा झाली.
भाजप नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.