

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने बळीराजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती व पीक कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्ज घेताना शेतकऱ्यांना होणारा अतिरिक्त आर्थिक बोजा कमी होणार असून लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व शेती आणि पीक कर्ज व्यवहारांवर कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही. यासंदर्भातील शासन निर्णय महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बँक किंवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेताना शेतकऱ्यांना आता वेगळे शुल्क भरावे लागणार नाही.
महसूल मंत्र्यांनी सांगितले की शेती हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, दुष्काळ, रोगराई अशा अनेक समस्यांचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी पीक कर्ज हा शेतकऱ्यांसाठी आधार असतो. मात्र कर्ज घेताना लागणारे विविध शुल्क आणि खर्च यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत होती. हे लक्षात घेऊन सरकारने मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील तरतुदींनुसार लोकहितासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जाची प्रक्रिया सुलभ होणार असून आर्थिक बचतही होणार आहे. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, तसेच शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या भांडवलाची गरज असते. मुद्रांक शुल्क माफ झाल्यामुळे कर्जातून मिळणारी रक्कम थेट शेतीच्या कामासाठी वापरता येणार आहे.
यापूर्वी राज्य सरकारने विविध प्रतिज्ञापत्रांवर लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ केले होते. त्या निर्णयाचा फायदा विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना झाला होता. आता शेती व पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा लाभ राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमार्फत घेण्यात येणाऱ्या कर्ज व्यवहारांसाठी लागू असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.