
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उद्या, 17 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून, महाराष्ट्रातही भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर #MyModiStory अंतर्गत पंतप्रधान मोदींसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण शेअर केली आहे.
फडणवीसांनी सांगितले की, त्यांची मोदींसोबतची पहिली भेट नागपुरात झाली होती. त्या वेळी ते नगरसेवक आणि युवा महापौर होते, तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शहरात संघ परिवाराचा अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी फडणवीसांकडे होती. देशभरातून आलेल्या वरिष्ठ नेत्यांसाठी उत्तम निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
मोदी नागपुरात पोहोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकाला वंदन केले. त्यानंतर जेव्हा फडणवीसांनी त्यांना विचारले की, ते कुठे थांबणार, तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्यांनी विश्रांतीगृह न निवडता, सरळ रेशीमबागेतील कार्यकर्त्यांसाठी असलेल्या साध्या छोट्याशा खोलीत राहण्याचा निर्णय घेतला. हा क्षण फडणवीसांना कायमस्वरूपी स्मरणात राहिला.
“मोदीजींची ही निवड त्यांच्या साधेपणाची, संघपरंपरेशी असलेल्या घट्ट नात्याची आणि कार्यकर्त्यांच्या जीवनशैलीशी एकात्म होण्याच्या वृत्तीची साक्ष देणारी होती. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात बारकाईने पाहणी केली आणि प्रत्येक सहभागी कार्यकर्त्याला सुविधा मिळत आहेत याची खात्री करून घेतली. तेव्हाच माझ्या मनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अढळ आदर निर्माण झाला,” असे फडणवीसांनी भावुक होत सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात देखील भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने येथे प्रथमच ड्रोन शो होणार आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचा शो होणार असून, हजारो ड्रोन पुण्याच्या आकाशातून प्रकाशचित्रांद्वारे मोदींना शुभेच्छा देणार आहेत. या उपक्रमामुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.