Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांनी दोनच मिनिटांचा युक्तिवाद केला अन् खटलाही जिंकला; मानधन म्हणून दादर-ठाणे तिकीट

Dr. Babasaheb Ambedkar And chandulal shah Case : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकारच नव्हते, तर एक निष्णात वकीलही होते. त्यांनी वकील म्हणून खटले लढले असून यातील गाजलले काही खटल्यांची आजही चर्चा होते.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाणे न्यायालयात चंदुलाल शहा यांचा खटला अवघ्या दोन मिनिटांच्या युक्तिवादात जिंकला.

  2. आरोपीवर बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याचा आरोप होता, पण न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले.

  3. मानधन म्हणून बाबासाहेबांनी फक्त ठाणे-दादर रेल्वे तिकीट घेण्याची मागणी केली.

Mumbai News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकारच नव्हते, तर एक निष्णात वकीलही होते. त्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा देतानाच सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेसाठी उच्च न्यायालय व इतर न्यायालयांत वकील म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

डॉ. आंबेडकरांनी १९२३ मध्ये उच्च न्यायालयात वकिलीची नोंदणी केली. वकील म्हणून सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर ज्ञान आणि कौशल्यामुळे त्यांनी मात केली. नाशिक जिल्ह्यातील महार जातीच्या जाधव बंधूंचा पहिला खटला आंबेडकारांना मिळाला. त्या खटल्यासाठी आंबेडकरांना सहाशे रुपये मानधन मिळाले होते.

'देशाचे शत्रू' प्रकरण (१९२६) :

केशव बागडे, केशवराव जेधे, रामचंद्र लाड आणि दिनकरराव जवळकर यांच्यावर 'देशाचे शत्रू' या पुस्तकातून टिळक आणि चिपळूणकर यांच्यावर टीका केल्याच्या कारणांवरून खटला भरवण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. या चौघांचे वकीलपत्र बाबासाहेबांनी स्वीकारले. टिळक आणि चिपळूणकर यांच्या नातलगांनी मानहानीचा दावा करणे उचित ठरले असते. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला बदनामीचा खटला करता येत नाही, असा युक्तिवाद आंबेडकर यांनी केला. न्यायाधीशांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून चौघांची मुक्तता केली.

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरांचा वाढदिवस पहिल्यांदा कुठे साजरा झाला होता? हत्तीच्या अंबारीत बाबासाहेबांची प्रतिमा...

फिलिप स्प्रंट प्रकरण (१९२७)

फिलिप स्प्रंट या ब्रिटिश कम्युनिस्ट नेत्याला 'इंडिया अँड चायना' हा लेख प्रकाशित केल्यामुळे देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हा लेख साम्राज्यवाद या जागतिक व्यवस्थेवर टीका करणारा होता. भारतातील कायद्याने स्थापन केलेल्या सरकारवर थेट हल्ला नव्हता. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ अंतर्गत देशद्रोहाचे निकष पूर्ण होत नाहीत, असा युक्तिवाद डॉ. आंबेडकर यांनी स्प्रंट यांच्या वतीने केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने स्प्रंट यांची मुक्तता केली.

रघुनाथ धोंडो कर्वे प्रकरण (१९३३)

'समाजस्वास्थ्य' या मासिकाच्या प्रकाशनामुळे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर अश्लीलतेचा ठपका ठेवून १९३१ आणि १९३४मध्ये खटला दाखल करण्यात आला. विकृत प्रश्न छापायचेच कशाला, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. त्यावर विकृती असेल तर ती ज्ञानानेच जाईल. नाहीतर कशी जाईल? मुळात लैंगिक विषयांवर कोणीही लिहिले तर त्याला अश्लील ठरवता कामा नये. मुळात अश्लीलता सामग्रीत नाही, तर व्यक्तिमत्त्वात आहे, असा युक्तिवाद बाबासाहेबांनी केला. तरीही र. धों. कर्वे आणि बाबासाहेब १९३४ मध्ये हा खटला हरले. कर्वे यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या वेळी डॉ. बाबासाहेबांनी कर्वे यांच्या वतीने युक्तिवाद करताना जे विचार मांडले ते आजही लागू पडतात.

अण्णासाहेब भोपटकरांची उलटतपासणी

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेधे यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात विचारवंत अण्णासाहेब भोपटकरांवर टीका केली होती. भोपटकरांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेधे यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. डॉ. बाबासाहेब व शंकरराव मोरे, शंकरराव जेधे यांच्यात तीव्र राजकीय वैमनस्य होते. तरीही त्यांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. या खटल्याच्या सुनावणीवेळी डॉ. आंबेडकरांनी अण्णासाहेब भोपटकरांची भेदक उलटतपासणी केली व उत्तरे देताना भोपटकरांची दमछाक झाली. त्यामुळे त्यांनी पुढील तारीख घेतली. अण्णासाहेब भोपटकर महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ विचारवंत असूनही त्यांनी पुढील तारखेस खटलाच मागे घेतला. या घटनेतून डॉ. बाबासाहेबांचे कायद्यावरील असामान्य प्रभुत्व आणि निष्णात वकिलीची झलक दिसून येते.

चंदुलाल शेठ यांची निर्दोष मुक्तता

शहापूर तालुक्यातील व्यापारी चंदुलाल शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते. शहा यांनी बाबासाहेबांची दादरच्या घरी भेट घेतली. त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, आंबेडकरांनी न्यायालयात शहा यांच्या वतीने अवघी दोनच मिनिटे युक्तिवाद केला. यानंतर न्यायाधीशांनी चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडले. त्या वेळी शहा यांनी बाबासाहेबांना मानधनाविषयी विचारताच त्यांनी केवळ ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट काढून देण्यास सांगितले.

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरांचा ‘तो’ ऐतिहासिक निर्णय! बौद्ध धर्मच का निवडला? जाणून घ्या!

FAQs :

1. हा खटला कुठे झाला होता?
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला झाला होता.

2. बाबासाहेबांनी किती वेळ युक्तिवाद केला?
फक्त दोन मिनिटांत त्यांनी युक्तिवाद पूर्ण केला.

3. आरोपी कोण होते?
चंदुलाल शहा नावाचे व्यापारी आरोपी होते.

4. आरोप काय होते?
बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याचा आरोप होता.

5. बाबासाहेबांनी मानधन काय घेतले?
फक्त ठाणे-दादर रेल्वे तिकीट घेण्यास सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com