

Controversy Erupts Over Girish Mahajan Statement on Operation Blue Star News : भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमध्ये एका कार्यक्रमात ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस होता असे विधान केले होते. तसेच त्यांनी या कारवाईदरम्यान भारतीय लष्कराला तीव्र प्रतिकार केलेल्या आणि ठार झालेल्या विभाजनवाद्यांचा उल्लेख ‘शहीद’ असा केला.
यावरून आता नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी यावर अक्षेप घेत महाजन यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे (NCP SP) सर्वसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया देत महाजनांना फटकारलं आहे. पण महाजन यांची भूमिका योग्य असल्याचे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्ताने केलेल्या भाषणात खासदार शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्या मताशी असहमती दर्शवली. यावेळी महाजन यांना चांगलंच सुनावलं. ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले एक गृहस्थ शीख समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ते गेले याची तक्रार नाही. पण आपल्या भाषणात त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केली. शीखांवर अन्याय झाला. त्यांच्या हत्या झाल्याचे म्हणाले. त्यांना शहीद म्हणाले.
ही गोष्ट खरी आहे की देशाच्या स्वातंत्र्यात शीख समाजाचं योगदान मोठं असून ते आपण कधी विसणार नाही. मात्र महाजन यांच्या मताशी आपण सहमत नाही, ते मंजूर नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार इंदिरा गांधी असोत किंवा राजीव गांधी त्यांनी शीखांवर अत्याचार केले. अत्याचार करणारे काँग्रेसचे नेते होते. शीखांवर काँग्रेसने आणि देशाने अन्याय केला असे त्यांचे म्हणणे म्हणजे संपूर्ण देशाची बेआब्रू करण्याचं काम आहे.
इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. पण महाराष्ट्रातील एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन शीखांची हत्या काँग्रेसच्या विचारांच्या लोकांनी केली अशी भूमिका मांडतो हे योग्य नाही. देशाच्या दृष्टीने योग्य नाही. नेहरु गेल्यानंतर इंदिरा गांधींनी देशासाठी पडेल ते केलं. पाकिस्तानला धडा शिकवला. बांगलादेशची निर्मिती केली. त्यांचे हे काम विसरून चालणार नाही आणि ते देशही विसणार नाही असे म्हणत महाजनांना चांगलंच सुनावलं आहे.
दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाजन यांची पाठराखण करत काँग्रेसच्या काळात शिखांवर अन्याय, अत्याचार झाला याचा निषेध आम्ही जन्मभर करत राहू, असे म्हणत सुनावलं आहे. फडणवीस यांना शरद पवार यांनी महाजन यांना सुनावल्यावरून विचारण्यात आलं. यावर त्यांनी, शरद पवार काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. त्यांचं भाषणही मी ऐकलं नाही. यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, असे म्हटलं आहे.
यांनी, महाजन यांनी शीख समाजाचा गौरव केला असून त्यांचे संपूर्ण भाषण हे समाजाप्रति गौरव करणारे होते. त्यांनी कुठलेही चुकीचं विधान केलेलं नाही. तसेच नेहरू-मोदींची तुलना करण्याचा विषय नाही, मोदी आणि नेहरू यांचे कार्य सर्वांना माहिती आहे. काँग्रेसनं शीख समाजावर अत्याचारच केला. काँग्रेसचा जन्मभर निषेध करतच राहू असे फडणवीस म्हणाले. तर महाजन यांनी अतिशय थोड्या वेळात शीख समाजाचा गौरव केला, असेही फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन पंजाबमधील भाषणात,"६ जून १९८४ हा काळा दिवस असून तो आपण कधी विसरु शकत नाहीत. आपले हजारो बहीण-भाऊ शहीद झाले, ते मारले गेले. आपल्या पवित्र धर्मस्थळावर सैन्याचं आक्रमण झालं, असंच मी म्हणेन. इंदिराजींनी सैन्याला जबरदस्तीने आपल्या पवित्र धर्मस्थळामध्ये घुसवलं. त्यानंतर क्रूरपणे आपल्या लोकांचे खून झाले.
अब्दाली आल्यानंतर त्याने आपल्या अनेक बहीण-भावांना शहीद केले होते. त्याच प्रमाणे आपल्याच देशात आपल्याच पंतप्रधानांनी आपली वाईट अवस्था केली होती. एवढे खून होऊनही कोणाला शिक्षा झाली नाही, याचं दु:ख असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यावरूच आता राजकीय वाद पेटला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.