
Goa Political Controversy: कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याने त्याची दखल दिल्लीतूनही घेण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर गावडेंची गच्छंती अटळ असून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे यांच्या पाठोपाठ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तसे थेट सुतोवाच केले.
मुख्यमंत्र्यांना सोमवारी (26 मे) मंत्रालयात पत्रकारांनी भाजप (BJP) मंत्री गावडे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, ‘जबाबदार मंत्र्याने बेजबाबदार विधाने करू नयेत. बेजबाबदार विधाने करणाऱ्या मंत्र्यावर कारवाई ही होणारच. यावर कारवाई कधी होणार असे विचारल्यावर कारवाई झाल्यावर दिसेल, तोवर प्रतीक्षा करा’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या विषयावर दिल्लीत (Delhi) वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे का? असे विचारल्यावर त्यांनी कारवाई होणार, असे सांगितले. आमदार हा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने मंत्री होतो. तो त्या पदावर राज्यपाल व मुख्यमंत्री यांची मर्जी असेपर्यंत तो मंत्रिपदी राहू शकतो, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याव्यतिरिक्त अन्य कारवाईचे कोणते पर्याय आहेत का? अशी विचारणा केली असता कारवाई होईपर्यंत थांबा, असे ठराविक साच्यातील उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, मंत्री गोविंद गावडे सध्या राज्याबाहेर आहेत. ते 29 मे रोजी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. 30 मे रोजी गावडेंना पक्षाकडून समन्स जारी करण्यात येईल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सध्या नाशिकमध्ये आहेत. ते 29 मे रोजी गोव्यात येणार आहेत. त्यानंतर 31 मे व 1 जून रोजी ते दिल्लीत असतील. त्याचवेळी मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय दिल्लीत होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. हा फेरबदल केवळ गावडे यांच्यापुरता मर्यादित राहणार नसून आणखी काहीजणांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत आहेत. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे सध्या केरळमध्ये आहेत. ते 28 मे रोजी सायंकाळी गोव्यात पोचणार आहेत. गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविल्यास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिपदी संधी मिळू शकते.
काँग्रेसचे गिरीश चोडणकर म्हणाले, ‘सध्या सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची चिंताजनक प्रवृत्ती दिसून येत आहे, याकडे मंत्रिमंडळातील मंत्री गावडे यांनीच लक्ष वेधले आहे. गावडे यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर प्रकाश पडतो आणि त्यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे'.
कला अकादमीच्या इमारतीला गळती लागली, ध्वनी यंत्रणा सदोष निघाली, छताचे तुकडे पडले, खुले सभागृह कोसळले. अशा या गोष्टी घडत असताना गावडे टीकेचे धनी झाले, तरी सरकारी पातळीवर त्यांची आजवर पाठराखणच करण्यात येत होती. सभापती तवडकर व गावडे यांचे पटत नाही. दोघांनीही जाहीरपणे एकमेकांचा उपमर्द केल्यानंतर मुख्यमंत्री व तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो वाद मिटला नाही आणि मंत्री आपला अपमान करतो, अशी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आदिवासी समाजाचा नेता कोण या छुप्या संघर्षातून उफाळलेला वाद आता विकोपाला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.