
Maharashtra Government : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीबरोबरच पशुधनाचे मोठे नुकसान झाले. लाखो रुपयांचे पशुधन वाहून गेल्याने, मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्यांच्या मनावर खोलवर जखम झाली होती. त्यातच सरकारी नियमानुसार केवळ तीन प्राण्यांसाठी मदत दिली जात होती. त्यामुळे पशुधनावर अवलंबून असलेला शेतकरी मोठ्या चिंतेत होता. पण महाराष्ट्र शासनाने या नियमात आता शिथिलता आणून प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे २८ जिल्ह्यांमधील पशुधनाचे मोठे नुकसान झाले. विविध जिल्ह्यातील लहान-मोठे असे मिळून तब्बल आठ हजार ६७८ जनावरे आणि एक लाख ६४ हजार ८२४ कोंबड्या मृत झाल्या आहेत. या सर्वांना आता शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यापूर्वी दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या पशुधनाच्या भरपाईवरील तीन प्राण्यांच्या मर्यादा होती. ती आता हटवण्यात आली आहे.त्यामुळे आता तीनपेक्षा अधिक जनावरांच्या मृत्यूची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्व मृत पशुधनाला शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची प्रक्रिया मदत व पुनर्वसन विभागाद्वारे सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे आजारी आणि जखमी पशुधनावर उपचार सुरू आहेत. यामध्ये पशुधनाची रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी लसीकरण हाती घेण्यात आले असून, ६५ लाख ३२ हजार गोवंशीय आणि ३१ लाख २५ हजार म्हैसवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ७६ लाख ९९ हजार शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
अतिवृष्टी बाधित क्षेत्रातील मृत पशुधनाच्या नुकसानीची अट शिथिल करण्यात आली आहे. अतिवृष्टीत मृत झालेल्या सर्व पशुधनाला शासन निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे, असेही देवरे यांनी सांगितले. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमध्ये लातूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पशुधन मृत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, जालना, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, वाशीम, यवतमाळ हे सर्वाधिक बाधित जिल्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.