
महाराष्ट्रातील सर्व काॅन्ट्रेक्टर्सनी (ठेकेदारांनी) ८९ हजार कोटींच्या थकीत देयकांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना अंतिम इशारा दिला आहे की, " आमची थकीत बिले द्या, अन्यथा महाराष्ट्रातील सर्वच कामे आम्ही बंद करू". यावरून महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, याची कल्पना आपणाला येईलच. सर्व सोंगे आणता येतील, पैशाचे सोंग घेता येत नाही. असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
बिहार राज्यातील बक्सर येथे 20 एप्रिल रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्या सभेसाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मात्र, सभेच्या ठिकाणी लोकांची संख्या कमी होती, अपेक्षित गर्दी या सभेला काँग्रेसला जमवता आली नाही. त्यावरुन, पक्षातही कुरबूर झाल्याने पक्षाच्या राज्यातील वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रदेशाध्यक्षांनी बक्सरच्या जिल्हाध्यक्षांचे तत्काळ निलंबन केले आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवारांनी थेट आपल्याला फोनवर नशेत शिव्या दिल्याचा आरोप भाजप आमदार हरीश पिंपळे यांना केला होता. महामार्गावरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आल्याचा आरोपही आमदारांनी केला होता. त्यानंतर आमदार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्यामध्ये आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती.
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावरून राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या माधव भंडारींवर राष्ट्रवादीने पलटवार केला. भंडारी यांची मानसिक स्थिती ढासळली आहे, त्यांना उपचाराची गरज असल्याचा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. उतारवयात विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याय. त्यांच्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर राष्ट्रवादी तन-मन-धनाने भंडारींना सहकार्य करणार असल्याचेही मिटकरी म्हणाले.
नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे हे शिवसेना शिंदेसेनेचे हदगावचे आमदार बाबुराव कदम यांच्यावर चांगलेच संतापले. कदम यांनी अतुल सावे यांना पत्र लिहून तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी विरोधकांना वाटप केल्याची तक्रार केली होती. तसेच नांदेडमध्ये आल्यानंतर निषेध व्यक्त करू, असा इशारा दिला होता. यावर अतुल सावेंनी कदम यांना थेट इशारा दिला असून आमच्याकडे पाच वर्षे 237 आमदार आहेत, ज्यांना युतीत राहायचं नाही ते बाहेर पडतील, अशा शब्दात सुनावले.
हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो. सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालाने आज त्याला 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. आता मी बोलायचे नाही ठरवले आहे. पण कार्यक्रम करायचं ठरवले आहे. अनेक जण मला आत्ता सांगतायत, माझा संबंध नाही. पण कोणी काय काय केलं आहे, त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. अनेक षडयंत्र माझ्या विरोधात झाली, ती सगळी सहन केली. पण शेवटचं षडयंत्र माझ्या विरोधात झालं, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणाचा कार्यक्रम कधी लागतो आहे, एवढाच विषय आहे, असा इशारा मंत्री गोरे यांनी दिला.
बीड पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेच्या पोलिस कोठडीत वाढ झाली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात 23 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. रणजीत कासले याला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली होती.
शरद पवार आणि संजय राऊत त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या शब्दांचे कधीही तोडमोड करतील, अशा शब्दात भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला. भाजपला 5 हजार वर्षापूर्वींचा इतिहास आहे, असे पण कधीच बोललो नाही, सध्या एआय आहे, त्यातून शोधून काढा,असं मत देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.
भाजप आमदार अतुल सावे यांनी ठाकरे बंधू यांच्या मनोमीलनावर, आणि पवार कुटुंबांच्या वाढलेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. ठाकरे कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये ते एकत्रित असेल तर आनंद आहे. पवारसाहेब आणि अजितदादा चौथ्यांदा एकत्र आले आहेत, त्यावर हा प्रश्न मला विचारून काय फायदा आहे, त्यांना विचारला पाहिजे, तुम्ही दोन्ही प्रश्न चुकीचे विचारले, असे आमदार सावे यांनी म्हटले.
योगगुरू बाबा रामदेव यांनी एका शरबतचा 'जिहाद'शी संबंध जोडून एक नवा वाद निर्माण केला आहे. यातून मिळणारे पैसे मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरले जातात, असा दावाही बाबा रामदेव यांनी होता. यानंतर आता राज्याचे मत्स व बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नावर थेट उत्तर दिलं टाळलं. 'मात्र, मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं', असे उत्तर दिलं आहे.
अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीरामपूरच्या पढेगावातील 12 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ तसेच ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्याहस्ते झाले. सरपंच किशोर बनकर, महेश खरात, पुष्पा भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते
सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. यावर अनेक नेत्यांनी वक्तव्य केले आहे. दोघे एकत्र आल्यास काय होणार याचे राजकीय आडाखेसुद्धा मांडले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याचे परिणाम जाणवेल असेही भाकित वर्तविले जात आहे. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, दोघे भाऊ एकत्र आले तरी महायुतीला कुठलाही धोका होणार नाही, असे म्हटलं आहे. तर सर्व रिपब्लिकन पक्षांनीसुद्धा एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही साद घातली आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या वेगळं वारं वाहू लागले असून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं असेही आवाहन केलं जातयं. अशावेळी यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य करताना, ते एकत्र आले तर काही नवल वाटणार नाही, असे म्हटलं आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत स्वत: राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली असून ही चांगली गोष्ट आहे. ते दोघं एकत्र आले तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. यामुळे सर्वांनाच आनंद होईल. पण याचा सर्वाधिक आनंद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना होईल. दोघं भाऊ एकत्र आले, तर महाराष्ट्रात एक वेगळी ताकद त्यानिमित्ताने निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला उधाण आलं असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र यावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील तशी इच्छा व्यक्त केली आहे. यादरम्यान आमदार रोहित पाटील यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे याकरिता माध्यमिक विद्यालयाला संतोष देशमुख यांचे नाव देणार असल्याची घोषणा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळा बांगर यांनी केली. याच महाविद्यालयाच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा देखील उभारणार असून या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले.
मुंबईवर झालेल्या 26 /11 च्या आतंकवादी हल्ल्याबाबत भाजपच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन सरकारमधील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा 26/11 च्या हल्ल्यांमध्ये वाटा होता असा आरोप जनता पार्टीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी, आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे सांगितलं आहे. तसेच त्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतल्याचे सांगितले आहेत.
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वॅटिकन सिटीमध्ये त्यांचे निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत संवाद साधताना भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. त्यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. देशाच्या प्रती, देशाच्या संविधानाने ज्या संस्था तयार केल्या आहेत त्यांच्याबाबत खोटं बोलत आहेत. त्या संस्थांबाबत खोटं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट असून वारंवार निवडणूक हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गा प्रकरणी आज दि.२१ सर्वाच्च न्यायालयात सुनावणी आहे. नाशिक महापालिकेने प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा दर्गा पाडल्याने पालिकेकडे न्यायालयाने खुलासा मागविल्याने पालिका काय बाजू मांडणार हे पाहावे लागणार आहे.
पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील असे न्यायालयाने नमूद केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मात्र 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिले आहेत.
पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकमधील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्यात येत आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील जिल्हाप्रमुख अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह मनसैनिकांकडून नाशिक महापालिका गेटवर घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत घंटा वाजवत मनसेचे आंदोलन सुरू केले आहे.
पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दुपारी ही सुनावणी होणार आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयात हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह दोन जणांना काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे. अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे आणि मुलगी सिद्धीने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत.
शाळांमध्ये हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्राचे राजकारण पेटलं आहे. मनसेनं हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये राजकीय वॉर सुरु झाले आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थबाहेरही हे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं हिंदी भाषेच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी केली. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर दादर परिसरात झळकलेत आहेत.
बारामतीमध्ये माळेगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामपंचयातीला या विषयी काहीच माहिती नव्हती. अल्पवयी मुलीच्या विवाहाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत हा प्रयत्न हाणून पाडला. मुलीचे वय अवघे तेरा वर्ष असल्याचे समोर आले. ग्रामसेवक इम्तियाज इनामदार यांनी फिर्यादीनुसार मुलीचे वडील, आई, होणारे सासरे, ,सासू आणि नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत सामनाच्या अग्रलेखातून मत मांडण्यात आले आहे. अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौैऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. पण संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवे होते तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले. या संख्येमध्ये मोठा घोळ आहे. कारण येवढे मतदान झाले तर पहाटे तीन पर्यंत मतदान होणे अपेक्षित होते मात्र निवडणूक आयोग आम्हाला मतदानाचे व्हिडिओ देखील देत नाही.
पुण्यात एका बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज दोघेही एकत्र येणार आहेत. साखर संकुलातील तंत्रज्ञानाविषयी असलेल्या एका बैठकीसाठी हे दोनही नेते एकत्र येतील.
वैयक्तिक मित्र होते. राज ठाकरेंशी हात मिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या. मात्र, ती अट आहे की राजकीय कट आहे अशी शंका आहे. आता वैयक्तिक मित्र विषय संपला, असे देखील शेलार म्हणाले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.