
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे. तर जखमींमध्येही महाराष्ट्रातील नागरिक असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बढती देण्यात आली असून मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीडचे जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज - उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची आहे. राज उद्धव एकत्र आले तर मविआचं काय करायचं ते ठरवू. आधी त्या दोघांचं काय ते ठरवू द्या. महाविकास आघाडी ही काही 20-25 वर्षांची नाही. दोन पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्या वेळची राजकीय गरज म्हणून मवीआ तयार झाली. राज उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय करायचं ते ठरवू. आधी त्या दोघांचं काय ते ठरू द्या. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. त्यात आम्ही पडणार नसल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या शासन निर्णयात हिंदी भाषा 'अनिवार्य' असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. आता अनिवार्य शब्दाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आधीच विचार करुन निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. पण, सरकारने हा निर्णय मागे घेतला यासाठी सरकारचे धन्यवाद, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
नेशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भातला पॅराग्राफ आहे. तीन भाषा शिकवण्यासंदर्भात, तीन भाषेचा हा फॉर्म्युला तिथ दिलेला आहे. केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाही. 2020 चे शैक्षणिक धोरण आहे. त्यानुसार, 9 सप्टेंबर 2024 ला तीन भाषेपैकी 2 भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजे, असं सांगण्यात आलंय, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. हिंदी भाषा अनिवार्य असा उल्लेख शासन निर्णयात आहे, तो शासन निर्णय हटवून नवा शासन निर्णय निर्गमीत केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील शिवसेना शिंदेसेनेचे हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांना पालकमंत्री अतुल सावे यांनी आमच्याकचे २३७ आमदार आहेत, तुम्हाला युतीत राहायचे असेल तर राहा, नाहीतर बाहेर पडा, असा सल्ला दिला होता. यावर कदम यांनी आता सावे यांना प्रत्युत्तर दिले असून विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहून लोकांनी मतदान दिले. जे २३७ आमदार निवडून आले आहेत, ते देखील शिंदे यांच्यामुळेच. सावेंना याचा विसर पडला का? असा सवाल कदम यांनी केला आहे.
खरोखर महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून, जर उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे दोन नेते एकत्र आले, तर विरोधकांना धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
माणिकराव कोकाटे कृषिमंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. परंतु मी शेती आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणल्याशिवाय राहणार नाही. राहुरी तालुक्यातील टाकळीमियां इथं शेतकरी मेळाव्यासाठी आले असता राजू शेट्टी यांनी कोकाटे यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील 1 लाख 96 हजार सहाशे हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठांकडे 35 हजार एकर क्षेत्र आहे. सरकार सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देताना शेतीच्या विकासात विद्यापीठाचा हवा तेवढा वाटा दिसत नाही, अशी खंत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदविदान सोहळ्यात त्यांनी ही खंत बोलून दाखवली.
वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी उपस्थित होते.
पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने चौंडी (ता. जामखेड) इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक सहा मे रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक 29 एप्रिल होणार होती, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीच्या नियोजनावर होणाऱ्या खर्चावरून वाद वाढला आहे.
14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता.
काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादेवर भाष्य केलं होते. त्यावरून न्यायालयावर वर थेट नाराजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली होती. ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता या टीकेदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयावर भाष्य केले आहे. त्यांनी, संसद हेच सर्वोच्च असल्याचे भाष्य करताना इतर कुणीही मोठे नाही असे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ (Ministry) बैठकीत आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये मंत्री नितेश राणेंच्या यांच्याकडील मत्स्य विभागाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मौजे नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटींच्या तरतूदीस मंजूरी, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता. कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ, 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ, मत्स्यव्यवसायास कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच चाकण ते शिक्रापूर रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महायुती सरकारने आजच्या (ता.22) कॅबिनेट बैठक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. तर मत्स्य व्यवसायला कृषीचा दर्जा दिल्याने आता मच्छिमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार असल्याचे मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यातील महायुती सरकारची आज (ता.22) कॅबिनेट बैठक झाली यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मच्छीमारांना शेती व्यवसायाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी ‘सरबत जिहाद’ ते वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर उच्च न्यायालयाने टीका करताना बाबा रामदेव यांना खडसावले आहे. बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या सरबत उत्पादनाची जाहिरात करत असताना हमदर्द कंपनीच्या रूह अफजा सरबत विरोधात जातीय तेढ निर्माण करणारे विधान केले होते. त्यावरून, या द्वेषाने भरलेल्या विधानामुळे जातीय तेढही निर्माण होत आहे. तसेच या विधानाचे समर्थन करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे.
सध्या दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. पण ते एकत्र आल्यावर काय होईल ते पाहायला आवडेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केलं आहे.
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.22) जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार शक्ती दुबे हिचा देशात प्रथम क्रमांक तर पुण्याचा अर्चित डोंगरे याचा देशात तिसरा क्रमांक आला आहे.
मुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह उद्धव ठाकरे असून त्यांच्या डोक्यात सतत लँड आणि लँड स्कॅम, असे विचार सुरु असतात. उद्धव ठाकरे यांनी काही नवीन बोलणे सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अदानीला दिली, ती जमीन अंबानीला दिली, असेच बोलत असतात, अशी टीका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले.
आम्ही पवार कुटुंब म्हणून आजही एकत्रच आहोत. आमचं कुटुंब वेगळे झाले आहे, असे मला वाटत नाही. राजकारणात विचार बदलू शकतात. परिस्थिती काही तरी करायला भाग पाडते. कुटुंब म्हणून तुम्ही तोडू शकत नाही. कारण ते रक्ताचं नातं असते, असे विधान युगेंद्र पवार यांनी केले आहे.
हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य करण्यासाठी सरकारी आदेश निघाल्यानंतर त्यावरुन वाद-प्रतिवाद सुरु आहे. हिंदी भाषिकांनी त्याचे स्वागत केले असले तरी मनसेने या निर्णयाला मात्र कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत राज ठाकरेंनी ही सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. या वादात आता नाशिकच्या महंतानी उडी घेतली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास यांनी शालेय शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी मंत्री अतुल सावे यांची तांडा वस्ती निधीच्या मंजुरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. खोट्या वस्त्या आणि लोकसंख्या दाखवून एक कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचा अतुल सावेंवर आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केराम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जोमाने काम केले. महाविकास आघाडीचा धर्म पाळला. पण काँग्रेस पक्षात ज्या निष्ठेने काम केले, त्याचे काहीच फळ माझ्या पदरात पडलं नाही, ही माझी खंत आहे. अनेक वर्षे मी आणि माझ्या वडिलांनी संघर्ष केला. तळागाळात काँग्रेस रुजविण्याचे काम केले आहे. पण आम्हाला आज भाजपत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भोरचे माजी आमदार तथा काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले संग्राम थोपटे यांनी आज मुंबई भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी आमदार थोपटे यांचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला विरोध असतानाच राज्यातील मराठी शाळांत संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी येथील नाशिकमधील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी, असे महंत सुधीर पुजारी यांचे म्हणणे आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची बैठक आज आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित आहेत. यावेळी युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले.
राज्य मंत्रिमंडळाची दुपारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शाळांमध्ये हिंदीची सक्ती व राज्यातील पाणीटंचाई या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणार का, याबाबत उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी धक्कादायक दावा केला आहे. कराड सध्या जेलमध्ये असला तरीही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचं गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. तसंच वाल्मिक कराड हा गुंड आहे हे माहिती असताना देखील बीड पोलिसांनी त्याच्या संरक्षणासाठी दोन कर्मचारी दिल्याचं गोल्डे यांनी सांगितलं आहे.
खूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे घनवट यांच्या पत्नी मनाली यांचा मृत्यूवर संशय उपस्थित केला जात आहे.
"आम्ही मागे एक रुपयांत पीकविमा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, ती योजना अडचणीत आली. खूप लोकांनी आम्हाला चुना लावला. आम्ही आता तुमच्या भल्याचं असेल, ते करणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नव्याने ही योजना आणली जाईल. यासाठी जुन्या योजनेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काही बदल केले जातील", असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात केस गळती नंतर त्याच रुग्णांना आता नख गळती सुरू झाली आहे. या गंभीर प्रकाराची आता केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यासाठी रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी तात्काळ एक पथक नेमले असून हे पथक आज संबंधित गावांचा दौरा करणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल द्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची मागील वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांना देखील हत्येआधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता झिशान यांना धमकी आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताची पोलिसांचे पथक झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.