
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर, उद्या दि. 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे. उद्यासाठीच आणखी एक विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होते आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटींसंदर्भात चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना चौकशी करुन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळवले होते.
एकनाथ शिंदे हे सातत्याने काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर रात्री 10 ते 11 च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे सर्व पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यांना मुंबईत कसे सुखरुप आणता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या पर्यटकांची जेवणाची सोयही केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांची एक टीम या आधीच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये पोहोचली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहरगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानतर सुरक्षा दलांनी कारवाईला सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनी खोऱ्यातून 1500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांचा समावेश आहे. पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला होता, यात २८ जणांचा मृत्यू झाल्याने देशात संतापाचे वातावरण आहे.
एका खासगी विमानाने इस्लामाबादवरुन उड्डाण केलं आणि ते नवी दिल्लीतील विमानतळावर पोहोचलं. त्या संबंधी आता वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. हे विमान बिझनेस जेट असून त्याचा उद्देश खासगी सेवा पुरवणे हा आहे. इस्लामाबाद ते नवी दिल्ली असा प्रवास शक्यतो कोणतंही खासगी विमान करत नाही. त्यामुळे या विमानाच्या आगमनानंतर मोठी चर्चा सुरू आहे. हे विमान भारतात कोणत्या कारणासाठी आले, याची माहिती समोर आलेली नाही.
आम्ही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण बाळगतो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकवटला आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, ही घटना लक्षात घेता भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. ज्यांनी पडद्याआड बसून भारताच्या भूमीवर अशी घृणास्पद कृत्ये करण्याचा कट रचला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिला.
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, जे गेले आहेत ते हिंदू आहे, हिंदूंना चुन चुन के मारेंगे, अशी पाकिस्तानची भूमिका दिसते आहे. हा देश हिंदूंचा आहे, सर्वांनी एकत्र होऊन सरकारला पाठिंबा द्यावा. सर्वपक्षीयांनी ही भूमिका घेऊन, पाकिस्तानला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नवनियुक्त तालुका अध्यक्षाच्या अभिनंदनचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनीच फाडले आहे. दोन दिवसांपूर्वी तालुकाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या विवेक करमोडा यांचे बॅनर तलासरीत फाडले गेले. डहाणू विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्यासह कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत घोषणाबाजी केली.
पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जळगाव मधील इकरा थीम कॉलेज आणि मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा बळी गेले असून, त्यांना दोन मिनिटांचे मौन पाळून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील 32 जण अडकले आहेत. त्यात रावेत, चिंचवडमधील काही रहिवासी आहेत. गाड्या सर्व अडकून पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आठ दिवस गाड्या सोडणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र सध्या सर्वजण सुखरुप आहेत. आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी हे ज्येष्ठ नागरिक करत आहेत.
पहलगाम इथल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्यावतीने बंद पुकारण्यात आला आहे. दिवसभर बंद पाळल्या नंतर सायंकाळी पाच वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवार बाजार मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. यामध्ये राज्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिक पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी, सर्व पर्यटकांशी आपण संवाद साधल्याची माहिती दिली आहे. तर सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रशासनास आपण बोलत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक तेथे अडकले आहेत. तर तेथून आपली सूटका करावी हाक ते राज्य सरकारला देत आहेत. आता याबाबत राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं असून पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी विशेष विमान पाठवले जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये डोंबिवलीतील तीन, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. तर अनेकजण अजूनही तिकडे अडकले असून त्यांना महाराष्ट्रात पर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्यात येईल असेही घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये डोंबिवलीत तिघांचा समावेश आहे. संजय लेले (44), अतुल मोने (52) आणि हेमंत जोशी असे तिघांचे नाव असून ते या हल्ल्यात ठार झाले आहेत.
सांगलीच्या राजकारणात सध्या अपक्ष खासदार विशाल पाटील चर्चेत असून त्यांना भाजप नेते तथा मंत्री चंद्राकांत पाटील यांनी ऑफर दिली आहे. आता याच ऑफरमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. तर मंगळवारी (ता. 22) झालेल्या बैठकीत याचे पडसाद उमटले असून काँग्रेस नेते जिल्ह्याचे निरीक्षक, माजी आमदार रामहरी रूपनवर यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम परिसरात मंगळवारी (ता. 22) झालेल्या दहशतवाद्यांनी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेत , दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडेंच्या मित्राचीही हत्या झाली आहे. याबाबतची माहिती प्रविण तरडेने पोस्ट शेअर करत दिली आहे.
जम्मूकश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या ०२२-२२०२७९९० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे राज्य शासनाने आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे.
पहलगाम हल्ल्यातील ती दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याचे समोर आले आहे. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा असे दहशतवाद्यांची नावे आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी मृतांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिल्याचं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवाय भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील संशयित हल्लेखोराचे स्केच आता समोर आलं आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. एनआयएचे पथक श्रीनगरला पोहोचले आहे. तर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. अशातच आता संशयित दहशदवाद्यांचे स्केच जारी करण्यात आलं आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानकडून देण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारतावरच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काश्मिर खोऱ्यात महाराष्ट्रातील जे पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुखरुप आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिंदेंच्या विनंतीची दखल नायडू यांनी घेतली आहे. उद्या खास विमानाने त्यांना महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे.
पहलगाम हल्लावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अमित शाह यांचा निषेध करा, मोदींचा निषेध करा. ही नौटंकीबंद करा. मंगलप्रभात लोढा यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही लोकांचा आक्रोश बघा, तुमच्या नौटंकीमुळे लोकांचा जीव गेलाय. मोदींना सुरक्षा आहे, फडणवीस, अमित शाह यांच्या मुलाला, कुटुंबाला सुरक्षा आहे. आमच्यासारख्या सामान्यांना सुरक्षा कुठे आहे? असं शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नाशिकमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. मनमाडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. गेल्या तीस वर्षांपासून धात्रक हे मनमाड नगर पालिकेत नगरसेवक आहेत. दोनदा त्यांनी मनमाडचे नगराध्यक्ष होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी बोललो. परिस्थितीची अपडेट मिळाली.
काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी.... हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते तातडीने भारतात परतले आहेत. जम्मु काश्मिरधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ते तातडीने भारतात आले आहेत. कालच्या हल्ल्यानंतर PM मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमित शाह हे श्रीनगरला गेले असून ते आज ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या घटनास्थळाला भेट देणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.