
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बडगुजर भेटले असून प्रवेशाचा अधिकृत निर्णय झालाय अशी काही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र, बडगुजरची हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकलं आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली. दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्यावर नितेश राणेंनी गंभीर आरोप केले होते. तसेच, दाऊदचा माणूस असलेल्या सलीम कुत्तासमवेतच्या पार्टीचे फोटोही त्यांनी शेअर केले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हाच सुरु झाली असून आता पुस्तकं छापली आहेत. मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना? असं काही नसेल असं मी गृहीत धरतो. पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
धनंजय मुंडेंचे पद गेलेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही काम नाही. ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे काही लोक अशी बातमी पसरवत आहे की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण ते होणार नाही, हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत करुणा मुंडे यांनी ही शक्यता फेटाळून लावली. प्रत्येक राजकीय व्यक्ती स्ट्रॅटर्जी प्लॅनर ठेवतो. स्ट्रॅटर्जी प्लॅनरने सांगितलं असेल की असं असं करा, असा टोलाही मुंडे यांच्या विपश्यना केंद्रातील शिबीरावर बोलताना करुणा मुंडे यांनी लगावला.
एकटे पडलेत, म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे? हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत? हा ही प्रश्न आहे. तर उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालाव लागेल. असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावला आहे.
देशसेवा आणि सैन्य दलाची आवड लहानपणापासूनच व्हावी या हेतुने आता शालेय विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळेत महिन्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मोहन भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचायला हवे. त्यांच्या स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने जे सरकार सत्तेत आणले त्या लोकांनी देशाचा कसा नरक केला आहे हे त्यांना कळायला हवे. या लोकांनी मानवी स्वातंत्र्याच्या लोकशाहीचा कसा गळा घोटला आहे हे या पुस्तकातून सरसंघचालकांना समजेल, अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्याबरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल-परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहीत आहे आणि आमचं मन देखील साफ आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेला एकत्र येण्यासाठी पुन्हा टाळी दिली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या, हे व्हिसेरा रिपोर्टवर अवलंबून आहे. त्यामुळं बावधन पोलिसांना हा रिपोर्ट लवकर मिळावा, यासाठी फॉरेन्सिक सायन्सचे तज्ञ आणि रासायनिक तपासन करणाऱ्या संस्थेला रिमाईंडर ही देण्यात आलाय. मात्र अद्याप हा व्हिसेरा रिपोर्ट आलेला नाही.
ठाकरेंच्या शिवसेनेतून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील हे 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच, हा प्रवेश थांबवून दाखवा, असे आव्हान मंत्री शिरसाट यांनी दिले.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक झाली. पुण्यातील शहर कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडली. पुणे महानगरपालिकेतील सर्व जागांवर मनसे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मनसे पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. राज ठाकरे 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात ते बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार असल्याची माहिती देण्यात आली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाराजी व्यक्त करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर बुधवारी त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पक्षाच्या या कारवाईनंतर आता सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. आणि जर त्या गुन्ह्याच्या शिक्षेचं हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार ? असा सवालच बडगुजर यांनी विचारला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. या टीकेला आता मंत्री महाजन यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना मी एकदाही फोन केला नाही. तशा स्वरूपाचे वक्तव्य संजय राऊत यांनी नैराश्यातून केले असल्याचे मत महाजन यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू-संतांचं महामंडळ तयार केलं आहे, त्यातले एक गिरीश महाजन आहे, अशीही टीका यावेळी राऊतांनी केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने गिरीश महाजन अनेक साधूसंतांच्या पाया पडत होते. पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे व प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडले पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.