

Mumbai News : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 मतदारसंघात निवडणूक होत आहे. २०२० पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील ६ महिन्यांत पार पडल्या. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली असून 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
या 17 पैकी एक जागा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचीही आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे होती. पण शिवसेनेचे या मतदारसंघात वर्चस्व वाढवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली असून तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पाहता याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) वर्चस्व राहिले आहे. या जागेचे प्रतिनिधित्व खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी केले होते. मात्र, आताची राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षनिहाय संख्याबळ पाहता, या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेने वर्चस्व वाढवले आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिंदे यांच्या शिवसेनेखालोखाल भाजपचे संख्याबळ आहे. तर राष्ट्रवादी संख्याबळाच्या बाबतीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेचे (Shivsena) संख्याबळ अधिक आहे. याठिकाणी एकट्या शिवसेनेची सदस्यांची संख्या २८९ वर पोहोचली आहे. तर भाजपचे संख्याबळ २८५ असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या केवळ १०६ इतकी मर्यादित आहे. अशा परिस्थितीत, ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ त्यांच्याकडे असल्याने या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे.
या निवडणुकीत ''गुरू-शिष्यांची'' राजकीय लढाई होणार आहे. खासदार सुनील तटकरे हे मंत्री उदय सामंत यांचे राजकीय गुरू मानले जातात. मात्र, आता राजकीय अस्तित्वाची वेळ आल्यावर उदय सामंत आपल्या शिवसेनेसाठी ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरे आपल्या मुलासाठी पुन्हा एकदा आग्रही राहणार हे निश्चित मानले जात आहे; परंतु शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही वाढलेल्या संख्याबळाच्या जोरावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केल्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षकाडून माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राजीव साबळे, अजित यशवंतराव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपकडून अद्याप नावे पुढे आली नाहीत. मात्र या दोन्ही पक्षाने या जागेवर दावा ठोकून तयारी सुरु केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.