शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि मंत्री असलेल्या दीपक केसरकरांवर गावबंदीची वेळ आली आहे. त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील गावात त्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आणि त्यासाठी कारण दिलंय ते दिलेल्या आश्वासनांची त्यांनी किती पूर्तता केली आहे याचे!
'5 वर्षांत एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय, पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास' केसरकरांविरोधात लिहिलेल्या फलकावरील या मजकुराची आता अख्ख्या सिंधुदुर्गात चर्चा सुरू झाली आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विरोधात काही लोकांनी लावलेले हे फलक म्हापण, परुळे, भोगवे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
'भाई आता खराच पुरे झाला, 'थांबा आता'...पाच वर्षांत जसा आमका तोंड दाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका..!' अशा आशयाचा संदेश देणारे फलक सध्या म्हापण, परुळे, भोगवे परिसरात अज्ञाताकडून लावण्यात आले आहेत.
याचा अर्थ पाच वर्षांत मतदारसंघात केसरकरांनी एकदाही तोंड दाखवलेलं नाही, आता यापुढेही तोंड दाखवू नका, असा होतो.
मागच्या निवडणुकीत (Assembly Election) चिपी विमानतळावर 'दोन हजार पोरा पोरींका नोकरी देतालास असा सांगितलं, पाच वर्षांत एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास' असा चिमटा काढणारा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे. म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चिपी विमानतळावर दोन हजार तरुणांना नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन मते घेतलीत. प्रत्यक्षात एकालाही नोकरी दिली नाहीत, असा आरोप केसरकरांवर करण्यात आला आहे.
या फलकाच्या सुरुवातीलाच, म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावे आठवतात का? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी तुम्ही इथे आला होतात, याची आठवण करून देत 15 वर्षांपासून तुम्ही आमचे आमदार हे आता आम्हीही विसरलो आहोत, असा टोला मंत्री दीपक केसरकरांना लगावण्यात आला आहे.
लोकसभा आणि नंतर लगेचच निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. त्याची ही झलक आहे. या गावबंदीच्या फलकात 'भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता' असं आवाहन मंत्री दीपक केसरकरांना करण्यात आलं आहे. तर शेजारच्या मालवणचा विकास झाला तो तालुका पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर आला. मात्र, आम्ही तुमच्या गजाली आयकत त्याच ठिकाणी राहिलो, असं त्यात म्हटलं आहे.
त्याआधी पर्यटनमंत्री म्हणून तुम्ही हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स त्याचबरोबर स्थानिकांना हॉटेल, पालक अनुदान पर्यटनातून रोजगार अशा गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही खूष झालो होतो त्यानंतर मतं घातली, परंतु तुमची हाऊस बोट काय आमच्या दर्यात पोचाक नाय, असं नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लावलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.