

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर शिंदे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज भरल्यामुळे लियाकत शाहांवर कारवाई करण्यात आली.
पक्ष शिस्त मोडल्यामुळे कारवाई आवश्यक असल्याचे जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव वाढत असून निवडणूक वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Ratnagiri News : चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसमध्येच दुफळली माजल्याचे समोर आले होते. येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी दंड थोपाटले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळ्याची चर्चा येथे सुरू झाली होती. यानंतर आता उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी काँग्रेसने ‘शह’ देणार्या यांना ‘शाह’ यांनाच जोरदार धक्का देत त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील करत दोन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिपळूणमध्ये काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून वाद उफाळला. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले लियाकत शाह यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने शिवसेना शिंदे गटातून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची लॉटरी लागली. यामुळे नाराज झालेले शाह यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले .
यानंतरच काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या. तर जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तसेच त्यांचा राजीनामा मंजूर करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले. काँग्रेसच्या चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच चिपळूण शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती केली आहे. ही निवड वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केलीय.या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर येथे काँग्रेसने ‘शाह’ यांना ‘शह’ दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी सुधीर शिंदे यांनी, काँग्रेसने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू तसेच चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.
म्हणूनच शाह यांच्यावर कारवाई!
काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर शिंदे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे असताना माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहणे चुकीचे आहे. यामुळे पक्षाकडून कारवाई होणे गरजेची होती. ती झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे.
FAQs :
1. काँग्रेसने लियाकत शाहांवर कारवाई का केली?
अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे.
2. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कोण आहेत?
सुधीर शिंदे हे काँग्रेसचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.
3. सोनललक्ष्मी घाग यांनी काय प्रतिक्रिया दिली?
पक्ष शिस्तभंग झाल्याने कारवाई आवश्यक होती असे त्यांनी स्पष्ट केले.
4. या कारवाईचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
अंतर्गत नाराजी आणि गोंधळ वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा पक्षाला तोटा होऊ शकतो.
5. लियाकत शाह आता कोणत्या भूमिकेत आहेत?
ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.