पालघर- डहाणू : डहाणू मतदारसंघात (Dahanu Constituency) अशक्य अशी गोष्ट काहीच नाही, स्थानिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी पक्षाची चांगली कामगिरी आहे. आपण थोडा प्रयत्न केला तर, स्थानिक स्वराज्य संस्था तर टिकवूच मात्र विधानसभेतही एक चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या आज (ता.23 ऑक्टोबर) दुसऱ्या दिवशी डहाणू येथे कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
संघटना आपल्याला बळकट करायची आहेच शिवाय आपले अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जागे करण्यासाठी आम्ही आलो आहोत. प्रत्येक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असे आवाहनही पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले. तर, वसई-विरार सोडला तर, संपूर्ण पालघरमध्ये आपल्यासाठी एक पोषक वातावरण आहे. या वातावरणाचे रुपांतर आपल्याला मतांमध्ये करून पालघर जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावेळी केले.
आव्हाड म्हणाले, ``डहाणू हा पुरोगामी विचारांचा गड आहे. शरद पवारसाहेबांचं या भागावर विशेष प्रेम आहे. मात्र, मधल्या कालखंडात पक्षापासून काही लोक दूर गेले. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे त्यामुळे एकदिलाने काम करा असे सांगतानाच राष्ट्रवादीच्या मदतीने अनेक जण निवडून येतात. मला खात्री आहे. आपण मनात ठरवले तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथली जागा जिंकू शकते.``
यावेळी आमदार सुनिल भुसारा, पालघर निरीक्षक अशोक सावंत, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, महिला जिल्हाध्यक्षा किर्ती मेहता, युवक जिल्हाध्यक्ष वरुण पारेख, युवती जिल्हाध्यक्षा हिंदवी पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.