

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक घेतली.
या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते.
या घडामोडींमुळे सावंतवाडी नगरपरिषदेतील महायुती युतीची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
Sawantwadi News : राज्यातील तब्बल 288 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्ष पदांची निवडणूक जाहीर केल्या असून आता राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. येथील राजकीय हालचाली आणि मोर्चे बांधणीला वेग आला आहे. अशातच जिल्ह्यात पडलेल्या महायुतीतील मिठाच्या खड्यामुळे नव्या समिकरणांचा जन्म होताना दिसत आहे. ज्यानंतर खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील मित्र पक्षाशी संबंध तोडू असाच पवित्रा घेतला आहे. यामुळे आता जिल्ह्यात शत्रू आणि राज्यात मित्र अशी सध्या भाजप आणि शिवसेनेची अवस्था झाली आहे. पण हिच स्थिती किमान सावंतवाडीत दिसू नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर मेहनत घेताना दिसत आहे. नुकताच याबाबत त्यांनी बैठक घेतली. ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून उमेदवारांना अर्ज देखील दाखल करण्याची मुदत सुरू झाली आहे. पण पहिल्या दिवशी एक देखील अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान याला येथील महायुतीतील वाद आणि जागा वाटपाबाबत न झालेली बैठक असल्याचे बोलले जात आहे. अशातच माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासह महायुतीबाबत बैठक घेतली.
यावेळी केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांनी युती संदर्भात घेतलेला पुढाकार आणि त्यानंतर सुरू झालेली युतीची बोलणी ही आशादायी गोष्ट आहे. आमची युती बाबत बोलणी सुरु असल्याने उद्या दुपारपर्यंत याबाबत सर्व स्पष्ट होईल, अशी माहिती दिलीय. त्यांनी युतीसह नगराध्यक्षपदाबाबतही भाजपशी बोलणी सुरू असून यावर निर्णय झाल्यानंतर भाष्य करू असे म्हणत सावध पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील चार परिषदेमध्ये कोणाच्या वाटाला किती नगराध्यक्ष याबाबतही चर्चा झाली. मात्र यावर काहीच फायनल निर्णय झालेला नाही उद्या दुपारपर्यंत युती संदर्भात चित्र स्पष्ट होईल.असे ते म्हणाले.
दरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती होणार की नाही असा संभ्रम असतानाच सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. तसेच त्यांनी राजवाड्याला भेट देत राज घराण्याची ही चर्चा केली. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केसरकर यांच्या निवासस्थानी येत युती करण्यासंदर्भात बैठक घेतली. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेत युती होण्याची शक्यता अधिक तीव्र वाटू लागली आहे.
मात्र जिल्ह्यात सध्या सुरू असलेला वाद, नितेश राणेंनी दिलेला स्वबळाचा नारा त्यानंतर केसरकरांनी दिलेला सल्ला आणि त्यावर सुका सल्ला म्हणत नितेश राणेंनी केलेला पलटवार यामुळे सावंतवाडी शहरातील शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. तसेच इच्छुक उमेदवारांमध्येदेखील कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे.
1. दीपक केसरकर यांनी बैठक का घेतली?
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी महायुतीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
2. या बैठकीत कोणते नेते सहभागी झाले होते?
भाजपचे प्रभाकर सावंत, शिवसेनेचे संजू परब आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते.
3. बैठकीचा मुख्य उद्देश काय होता?
सावंतवाडी नगरपरिषदेतील जागावाटप आणि महायुती युतीबाबत निर्णय घेणे हा उद्देश होता.
4. सावंतवाडीमध्ये महायुती युती होणार का?
होण्याची शक्यता अत्यंत बळकट झाली असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची चिन्हे आहेत.
5. या बैठकीचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
युती झाल्यास विरोधकांसाठी परिस्थिती कठीण होऊ शकते आणि महायुतीला स्थानिक पातळीवर मोठा फायदा होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.