NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुतण्याने साथ सोडली. पवार ज्यांना कुटुंबातील सदस्य मानायचे ती हक्काची माणसे सोडून गेली तरी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम आणि तालुकाध्यक्ष जयंद्रत खताते मात्र शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहेत. उद्या (ता. ५ जुलै) मुंबईत होणाऱ्या बैठकीला हे दोघे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोणकोणत्या गटात आहे, हे हळूहळू समोर येत आहे. (Former MLA Ramesh Kadam supports to Sharad Pawar)
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर शरद पवार यांच्याबरोबर कोण आणि अजित पवार यांच्याबरोबर कोण आहे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी (ता. ५ जुलै) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. बैठकीच्या आदल्या दिवशी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) मुंबईत पोहचले. ते पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते बुधवारी सकाळी मुंबईत पोहचणार आहेत.
आम्ही सर्वजण शरद पवार यांच्याबरोबर आहोत. नैतिक, नीतिमत्तेच्या आधारावर मी पक्षातच राहणार आहे. काही कारणांसाठी काहीजण इकडे तिकडे जात असतील. मी शरद पवार यांचाच कार्यकर्ता आहे. पवार कुटुंब आदर्श कुटुंब आहे. त्यांच्यात जे काही प्रश्न असतील, ते एका मिनिटांत सुटतील, असा विश्वासही खताते यांनी व्यक्त केला.
मुंबईत जाण्यापूर्वी रमेश कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सत्तेसाठी आणि ईडीच्या भितीपोटी कुणी कुठेही जात आहे. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या थराला गेले आहे. शरद पवार यांना या वयात सोडून जाणे बरोबर नाही. या वयातही शरद पवार तरुणाचे काम करत आहेत. हिंमतीने पक्ष बांधत आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत. त्यामुळे मी व माझे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.