मुंबई : २०२४ च्या निवडणुकांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा लक्ष्य भाजपने (BJP) ठेवले आहे. या तयारीची पहिली पायरी म्हणून भाजपने आपल्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे राज्यातील २ लोकसभा मतदारसंघाची आणि त्या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. या माध्यमातून त्या नेत्याला मतदारसंघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी, बूथ लेव्हलचा कार्यकर्ता जबाबदारी, स्थानिक राजकीय गणिते, स्थानिक राजकारण अशी सगळी गणित साधत प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी मजबूत करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
या यादीवर नजर टाकल्यास राज्य भाजपचे नेतृत्व करणारे आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सोलापूर आणि अहमदनगर या मतदारसंघांची जबाबदारी आली आहे. याशिवाय सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), पंकजा मुंडे (Pankaja Munde), रविंद्र चव्हाण (Ravindra chavan), गिरीश महाजन (Girish Mahajan), रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दरेकर अशा एकूण १२ नेत्यांकडे राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र याच यादीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे किंवा त्यांच्या दोन्ही मुलांपैकी कोणाचेही नाव दिसून येत नाही. त्यामुळे राणे कुटुंबियांना भाजपमध्ये डावललं जात आहे का? अशा चर्चांना उधान आलं आहे.
मात्र येत्या काही दिवसात आणखी काही नेत्यांना लोकसभा मतदारसंघ वाटून दिले जाणार आहेत. त्यामध्ये नारायण राणे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत राणे प्रतिक्षा यादीवर असल्याचे बोलले जात आहे. राणे पिता-पुत्र अतिशय आक्रमक राजकारणी म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब आणि मुंबई महानगरपालिकेवर आरोप आणि टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. शिवाय राणे कुटुंबीयांच्या चुका शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. त्यामुळे राणे विरुद्ध मातोश्री हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
भाजपचे नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी याबाबत बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले आहे. त्यांच्या खात्यालाही भरघोस निधी दिला. याशिवाय निलेश राणे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. तर आमदार नितेश राणे यांच्याकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे राणे यांना भाजपने कुठेही डावलले नाही. आगामी निवडणुकीत राणे पॅटर्न चालणार हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.