Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यासाठी स्थानिक पातळीवर छोट्या मोठ्या कुरघोड्या सुरू आहेत. अशातच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्रोत्सवच्या मंचावर एक विधान केल्याने भाजप आणि शिंदे गटात पुन्हा ठिणगी पडली आहे.
येत्या निवडणुकीत एनडीएचे ४०५ खासदार निवडून आणायचे आहेत. त्यातील एक कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही खासदार असेल, असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. मंत्री चव्हाण यांनी विजयादशमीला केलेल्या या वक्तव्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने डोंबिवलीत नमो रमो नवरात्रोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमीच्या दिवशी मंत्री चव्हाण यांनी कुटुंबासमवेत देवीची आरती केली. यानंतर नागरिकांचे आभार मानताना त्यांनी एक आवाहनदेखील केले.
पंतप्रधान मोदींनी २०१४ पासून आजपर्यंत ९ वर्षांमध्ये आपल्या देशाची आणि भारताची प्रचिती संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीने पसरवली आहे. तुम्हाला आम्हाला या सर्वांना याचा गर्व आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही या देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढवायचे आणि म्हणून या व्यासपीठावरून मी विनंती करणार आहे, असे चव्हाण म्हणाले.
आपल्या सर्वांना या देशांमध्ये एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार निवडून आणायचे आहे आणि त्यामधील एक खासदार कल्याण लोकसभा मतदारसंघाचा असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपण दर वेळेला सहकार्य करता या वेळेला हे मताधिक्य एवढे मोठे असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्या सर्वांना ही विनंती केली आहे, उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त खासदार देणारे महाराष्ट्र राज्य असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण काम करूया, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्गची जागा रवींद्र चव्हाण लढवू शकतात?
दरम्यान, सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा माजी खासदार नीलेश राणेंनी केली. आणि निवडणुका वगैरे लढण्यात रस राहिला नसल्याचं ट्विटही केलं. यावरून भाजपमध्ये वाद रंगल्याची चर्चा आहे. डोंबिवलीत कॅबिनेट मंत्री चव्हाण यांनी केल्याने सिंधुदुर्गची लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवू शकतात, असे सांगण्यात येत होते. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा खासदार श्रीकांत शिंदे हेच लढवतील, अशीही चर्चा आहे.
Edited by : Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.