Ratnagiri : लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे गट) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लढायची तयारी सुरु केली आहे. मात्र, भाजपने या जागेसाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांना तयारी करण्यास सांगितले आहे. त्यावर किरण सामंत यांनी व्हाॅट्सअपला स्टेट्स ठेवत भाजपला एक प्रकारे चॅलेंजच केले आहे.
रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार याची आज सकाळपासूनच चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर किरण सामंत यांनी व्हाॅट्सअपला मी किरण सामंत, रोकेगा कौन ? कॅप्शन टाकून ते निवडणुक लढण्यावर ठाम असल्याचे संकते दिले. या आधी देखील किरण सामंत यांनी आपल्या स्टेट्सला ठाकरे गटाची मशाल ठेवली होती. त्यावेळी ते ठाकरे गटात जाणार, अशा चर्चा झाल्या होत्या.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत सिंधुदुर्गचे खासदार आहेत. दोन वेळा खासदार म्हणून राऊत निवडून आले आहेत. यंदा त्यांना हॅट्रीकची संधी आहे. शिंदे गटाची येथे ताकद असल्याने मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे येथून लढण्यास उत्सुक आहेत. मात्र,भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाच्या चर्चेने ते काय निर्णय घेणार याची चर्चो होती. मात्र, किरण सामंत, रोकेगा कौन ? असे व्हाॅट्सअप स्टेट्स ठेवून माघार घेणार नसल्याचे संकेत दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
किरण सामंत हे रत्नागिरीतील राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जातात. किरण सामंत हे पडद्यामागे राहून काम करतात. मात्र, २०२२ पासूनच त्यांनी लोकसभेच्या दृष्टिने तयारी सुरू केली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे गटातून सक्रीय झाले होते. तेच शिवसेनेकडून खासदारकीचा चेहरा असेल, असे म्हटले जात होते. त्यामुळे ठाकरे गटातील विनायर राऊत विरुद्ध शिंदे गटातील किरण सामंत असा सामना होणार,अशी जिल्ह्यात चर्चा होती. मात्र, रवींद्र चव्हाण यांची इंट्री ही किरण सामंत यांना धक्का मानली जात आहे.
स्टेट्सला चॅलेंजची भाषा करणारे सावंत मीडियाशी बोलताना सावध होते. रवींद्र चव्हाण मला मोठ्या भावा प्रमाणे आहेत. त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांचा जोराने प्रचार करेन, असे सांगितले. तसेच महायुतीतील प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे.सर्वांनी पाठिंबा दिल्यास खासदार महायुतीचा असेल, असा आशावाद व्यक्त केला.