अविनाश चंदने-
Lok Sabha Election 2024 : पाच राज्यांच्या निकालानंतर देशात लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीए आणि विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने यापूर्वीच एकजुटीच्या आणि जागांच्या वाटपांसंदर्भात चर्चांना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. रायगडमध्येही यापेक्षा वेगळे काही घडत नाही.
रायगड लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने अनंत गिते यांना गेल्या महिन्यात उमेदवारी जाहीर केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी पराभव केला होता. तर सुनील तटकरे आता अजित पवार गटात असल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस हक्क दाखवत आहे. कर्जतमधील चिंतन शिबिरात अजित पवारांनी तसा दावाही केला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही रायगड लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे असावा, असे वाटते. यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल काय आहे, तेही पाहायला हवे.
रायगड जिल्ह्यातून दोन खासदार निवडून येतात. रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरी जिह्यातील गुहागर, दापोली या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी अलिबाग (महेंद्र दळवी), महाड (भरत गोगावले) आणि दापोली विधानसभा मतदारसंघात (योगेश कदम) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर पेण विधानसभा मतदारसंघ (रवी पाटील) भाजपकडे आहे. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आमदार आहेत. तर गुहागर मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार (भास्कर जाधव) आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना रायगड लोकसभा जागेसाठी आग्रही आहे. तर भाजपचीही नजर या मतदारसंघावर आहे. भाजपने तर रवी पाटील यांच्या सोबतीने धैर्यशील पाटील तसेच दिलीप भोईर या शेकापच्या नेत्यांना आपलेसे करत रायगडमध्ये हातपाय पसरायला सुरुवात देखील केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेत फूट पडल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदेंसोबत गेले. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. मावळ मतदारसंघात रायगडमधील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील प्रशांत ठाकूर (पनवेल) हे भाजपचे आहेत तर महेश बालदी (उरण) हे कट्टर भाजप समर्थक अपक्ष आमदार आहेत. कर्जतचे महेंद्र थोरवे हे शिंदे गटाचे आमदार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे असून ते शिंदे गटाचे आहेत. तर या मतदारसंघावर भाजप दावा सांगण्याचा तयारीत आहे. थोडक्यात रायगड जिल्ह्यातील एकूण सातपैकी तीन आमदार शिंदे गटाचे, तीन आमदार भाजपचे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा आहे. रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याला जोडणारे हे दोन खासदार असल्याने रायगड तसेच मावळ मतदारसंघासाठी सध्या महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.