
Ratnagiri News : रायगड जिल्ह्यात सध्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी ताकद पणाला लावली आहे. पण या दोन पक्षांमधील वादाची झळ आता शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्याला बसताना दिसत आहे. ( Raigad guardian minister post dispute between Shiv Sena and NCP, and its impact on Ratnagiri district)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी खा. तटकरे यांनी मंडणगडमधील अजित यशवंतराव आणि काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून घेतला. विधानसभा निवडणुकीवेळी उदय सामंत यांच्यावर अजित यशवंतराव यांनी टीका केली होती. त्याच यशवंतराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने सामंत बंधू नाराज झाले.
मंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हा पक्षप्रवेश चांगलाच जिव्हारी लागला. त्यांनी नाराजी व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसला खडे बोल सुनावले. अप्रत्यक्षपणे आमदार शेखर निकम आणि तटकरे यांना लक्ष्य केले. यावरून निकम आणि तटकरे यांनी आपल्या स्टाईलने पालकमंत्र्यांना उत्तर दिले.
या पक्ष प्रवेशाला प्रत्युत्तर म्हणून सामंत बंधूंनी दुसरा डाव टाकला. दोघांनीही थेट चिपळूणमध्ये येत शरद पवार राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांना गळ घातली. किरण सामंत आणि उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांची भेट घेतली. त्यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली. यातूनच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.
यावर बोलाना तटकरे यांनी, महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून आम्ही अजित यशवंतराव यांना पक्षात घेतले. त्यांनी इतरांचा प्रवेश केला त्यावेळी आम्हाला विचारले होते का? तसंच सामंत नाराज झाले असले तरी ते माझेच चेले आहेत. महायुतीच्या बैठकीत ते भेटतील त्यांची शंका दूर करू असे तटकरेंनी टोला लगावला.
तर आमदार शेखर निकम यांनी, पालकमंत्री दर शनिवारी चिपळूणमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. ते आले तर आमची छोटी-मोठी कामे सोडवण्यास मदत होईल. तसेच पालकमंत्र्यांनाही त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. माझा जीव काही आमदारकीत अडकलेला नाही. त्यामुळे महायुतीत कोणीही आले तरी त्यांचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री आणि प्रशांत यादवांच्या भेटीवर आमदार निकम यांनी दिली.
निवडणुकांची तयारी करत असताना शिवसेना-राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारणाला सुरूवात झाली आहे. सामंत, निकम, तटकरे एकमेकांविरोधात डावपेच खळताना दिसत आहेत. या फटकेबाजीमुळे आगामी काळात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी यांच्यातील वाद वाढणार की शमणार हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.