Kiran Samant On Rajan Salvi: किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असं वक्तव्य आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलं होतं. साळवी यांच्या वक्तव्यावर आता किरण सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय सामंतांनी यावेळी साळवींना टोलादेखील लगावला आहे.
किरण सामंत (Kiran Samant ) म्हणाले, मला खासदार करायचे की नाही याचा निर्णय महायुती घेईल, मला खासदार बनवायला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. परंतु, राजन साळवी यांनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी. तसेच राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला नाही तर त्यांच्या विरोधात लांजा विधानसभा मतदारसंघातून मीच निवडणूक लढणार असंही सामंत यांनी म्हटलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भविष्यात लांजा राजापूर मतदारसंघ महाआघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी असा सल्ला किरण सामंत यांनी दिला आहे. भविष्यात मी निवडणूक लढवली तर धनुष्यबाण याच चिन्हावर लढवेन असंही ते म्हणाले. राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत (Shivsnea) प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन असा इशाराच सामंत यांनी साळवींना दिला आहे.
मागील काही दिवसांपासून किरण सामंत हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) डावललेली उमेदवारी आणि या मतदारसंघातील ऐन मतदानाच्या दिवशी दिवसभर किरण सामंत नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमुळे सामंत नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर साळवी यांनी सामंत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर किरण सामंत यांनी दिलं आहे. त्यामुळे निवडणूक पार पडली तरी कोकणातील राजकीय वातावरण अजून थंड झालं नसल्याचं दिसत आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.