चिपळूण (जि. रत्नागिरी) : चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे सरपंचपदी (Sarpanch) झालेला विजयी उमेदवार आमचाच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना ठाकरे (Shivsena) आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) केला होता. मात्र, त्यांचा हा दावा खुद्द सरपंच पंकज साळवी यांनीच खोडून काढला आहे. मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच गावविकास पॅनेलचा आहे. माझ्या विजयात सर्वपक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच आपण सरपंचपदावर बहुमताने विजयी झालो असल्याचे स्पष्टीकरण असुर्डेचे नवनिर्वाचित सरपंच पंकज साळवी यांनी दिले आहे. (Sarpanch of Asurde village rejected the claim made by Shiv Sena, NCP)
या निवडणुकीत गावविकास पॅनलकडून पंकज साळवी निवडणूक लढवत होते. गावाने ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून दिले; मात्र सरपंचपदासाठी एकमत न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत पंकज साळवी यांनी ४०० मतांनी विजयी मिळवले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी सरपंचपदावर दावा केला; मात्र हा दावा नवनिर्वाचित सरपंच साळवी यांनी खोडून काढला आहे.
सरपंच साळवी म्हणाले, मुळात मी अनेक वर्षे शिवसेनेचे काम करतो आहे. नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. मी जरी शिवसेनेचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच गावविकास पॅनलचा आहे. माझ्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस अशा सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. राजकारणविरहित निवडणूक आम्ही घेतली आहे. खरेतर संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध करावयाची ठरली होती. सरपंचपदावर एकमत झाले नाही; मात्र बहुतांशी गाव माझ्याबरोबर आहे, हे मताधिक्यावरून दिसून आले.
मी सरपंच कोणत्याच पक्षाचा नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या यादीत माझे नाव घेऊ नये. गावात विविध विकासकामे करताना सर्वांनाच सोबत घेऊन जावे लागते. त्यानुसार सर्वांच्या सहकार्यातून गावात जास्तीत जास्त विकासकामे करण्यावर भर दिला जाईल, असे असुर्डे गावचे सरपंच पंकज साळवी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.