Maharashtra Politics Latest News : महाराष्ट्रातील आजवर अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ घेतलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पाला लागलेली नकारघंटा अजूनही तशीच आहे.
मागील दहा पंधरा वर्षांत सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर सिंधुदुर्गवासीयांना दाखविण्यात आले. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. 2018 मध्ये देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 56 कोटी निधी मंजूर झाला. त्यातील काही निधी वितरितही झाला होता. मात्र वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला.
सिंधुदुर्गात मागील 10-15 वर्षांत पर्यटन वाढीसाठी नव्याने एकही संकल्पना राबविण्यात आली नाही. किंवा कोणतेही नवे पर्यटन आकर्षण निर्माण केले नाही. सरकारे बदलत असली तरीही जिल्ह्यातील नेतृत्वांनी पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला नाही.
पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव देश पातळीवर गेले असते. परिणामी सिंधुदुर्गमध्ये उच्च दर्जाचे पर्यटन प्रस्थापित झाले असते. जिल्ह्यातील इतर किनारपट्टीवर पर्यटन वाढीस लागले असते. या प्रकल्पाची संकल्पना, अहवाल आणि निधीची तरतूदही करण्यात आली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या, याचे राज्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे धडाडीने काम करण्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकताच नौदल दिन यशस्वी करून दाखविला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणेही धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या द्वयींनी सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पात लक्ष घातले तरच, हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. अन्यथा गुजरातच्या स्वप्नांमध्येच धन्यता मानण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर येणार आहे.
सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह 24 प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर 100 ते 150 कोटींची उलाढाल होणार होती. प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
महाराष्ट्राची संकल्पना गुजरात साकारते
गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवित आहेत. जानेवारीत व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे. समुद्रात 300 फूट खोल जाऊन पर्यटकांना बुडलेल्या द्वारकानगरीच्या अवशेषांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण या प्रकल्पाबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.