कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान राखण्यात येईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे (sunil Tatkare) यांनी दिली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर लाड यांनी घेतलेली भूमिका पक्षाला परवडणारी नव्हती. त्यातच जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकांची तारीखही जाहीर झाली आहे. अशावेळी खासदार तटकरे यांनी लाड यांची मनधरणी केली आणि अखेर लाड यांनी राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले. लाड यांचे राजीनामानाट्य अवघ्या दोन दिवसांतच संपुष्टात आले. (Suresh Lad's resignation as NCP Raigad district president rejected)
पनवेल येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) खासदार सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांच्यामध्ये बैठक झाली. बैठकीत खासदार तटकरे यांनी लाड यांची व्यथा, अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या अडचणी आगामी काळात सोडविण्यात येतील, असा विश्वास देत तुमची पक्षाला नितांत गरज आहे. या पुढील जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणुका तुमच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येतील, त्यामुळे तुम्ही राजीनामा मागे घ्यावा, अशा शब्दांत लाड यांची खासदार तटकरे यांनी मनधरणी केली. अखेर तटकरेंच्या या शिष्टाईला यश येऊन लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले.
दरम्यान, आगामी काळामध्ये शिवसेनेसोबत युती न करण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असा विचारही या वेळी झाला.
लाड यांच्या राजीनाम्याबाबत खासदार सुनील तटकरे म्हणाले की, माझ्या विनंतीला मान देत सुरेश लाड यांनी रायगड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. या पुढील जिल्ह्यातील सर्व निवडणुका लाड यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येतील. लाड यांचे पक्षासाठी मोठे योगदान असून पक्ष त्यांचा योग्य वेळी योग्य तो सन्मान करेल. हे निश्चित.
प्रकृती अस्वास्थामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या युद्धाचे रणशिंग फुकलेले असताना कार्यकर्त्यांना सोडून घरात बसून राहणे मला योग्य वाटत नाही, त्यामुळे माझा राजीनामा मागे घेतला, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.