

Uday Samant-MNS Political Clash News : रत्नागिरीत साळवी स्टॉप येथील दहीहंडी उत्सवात डीजेच्या आवाजावरून रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) थेट आव्हान दिले. मंत्री सामंत भाषण करीत असताना डीजेचा आवाज वाढवत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला.
यावर त्यांनी उत्तर दिले, "माझा आवाज बंद करणारा अजून या धर्तीवर पैदा झालेला नाही! आतापर्यंत मी पाच वेळा अनेकांचा डीजे बंद पाडला आहे. तुम्ही आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक तरी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणा, मग तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे!" अशा कडक शब्दांत मनसेचा समाचार घेतला.
या जाहीर इशाऱ्यामुळे गोविंदांच्या थरांसोबतच रत्नागिरीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे थरही चांगलेच तापले आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात धार्मिक उत्साहापेक्षा राजकीय कलगीतुऱ्यानेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. उत्सव साजरा करताना शहरात निर्माण झालेले राजकीय वातावरण आणि नेत्यांमधील शाब्दिक युद्ध यामुळे हा गोपाळकाला चांगलाच तापल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला गोविंदांच्या थरांचा जल्लोष सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टोकाची राजकीय चुरस थेट स्टेजवरून दिसून आली.
शहरातील साळवी स्टॉप येथे मोटार मालक असोसिएशनतर्फे आयोजित दहीहंडी सोहळ्यात पालकमंत्री सामंत हे भाषणासाठी उभे राहिले. पालकमंत्री माईक हातात घेऊन बोलू लागताच, अगदी समोरच असलेल्या मनसेच्या व्यासपीठावरून डीजेचा आवाज अचानक वाढवण्यात आला. आपल्या भाषणात अडथळा आणण्याचा हा प्रयत्न पाहून मंत्री उदय सामंत संतप्त झाले. त्यांनी संयम सोडत थेट रोखठोक भाषेत विरोधकांना सज्जड दम भरला.
संतप्त झालेल्या सामंतांनी जाहीर व्यासपीठावरून ठणकावून सांगितले की, "मी आतापर्यंत पाच वेळा अनेकांचा डीजे बंद पाडला आहे, माझा आवाज बंद करणारा अजून या धर्तीवर पैदा झालेला नाही!" त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि मैदानावरील वातावरण एकदम गरम झाले.
केवळ डीजेच्या आवाजापुरते हे प्रकरण मर्यादित राहिले नाही, तर सामंतांनी पुढे जात मनसे पक्षाला थेट राजकीय आव्हानदेखील दिले. "तुम्ही आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक तरी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणा, मग तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे," असे खुले आव्हान त्यांनी दिले.
रत्नागिरीतील या दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदांच्या थरांसोबतच राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे थरही जोरदार रचले गेले. एकाच शहरात समोरासमोर झालेल्या या दहीहंडी सोहळ्यांमुळे आणि नेत्यांच्या या जाहीर फैरींमुळे यंदाचा हा सण संस्कृतीपेक्षा राजकीय वर्चस्वाच्या लढाईसाठीच अधिक चर्चेत राहिला आहे. आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी या संघर्षामागे स्पष्टपणे जाणवत असून, या वादानंतर रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.