Political Live Update : हेरगिरीच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक युट्युबर आयबीच्या जाळ्यात

Sarkarnama Headlines Updates : भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील तणावासह महाराष्ट्रातील आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या ताज्या घडामोडी एकाच क्लिकवर...
YouTuber Priyanka Senapati
YouTuber Priyanka Senapatisarkarnama
Published on
Updated on

Sujaat Ambedkar News : सरन्यायाधीशांवरील सुजात आंबेडकरांच्या टीकेवर रिपाई (गवई गट) नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाला, 'पदाचा सन्मान...'

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान टीका केली होती. त्यांनी, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जातीय वर्गीकरणाचा कायदा आणण्याचा निर्णय देत आरक्षणाला धक्का लावण्याचं काम केले. यामुळे बौद्ध असण्यापेक्षा विचारांनी आंबेडकरवादी असणे आवश्यक असल्याची बोचरी टीका केली होती. या टीकेवर आता रिपाई (गवई गट) नेते राजेंद्र गवई यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, सुजात यांनी नैराश्येपोटी हे विधान म्हणताना, अशी टीका करणे अयोग्य असून सवैधानिक पदाचा सन्मान ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे.

Saifullah Khalid News : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची हत्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवादी सैफुल्लाह खालीदची हत्या करण्यात आली आहे. त्याची गोल्या झाडून हत्या करण्यात आल असून तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता.

YouTuber Priyanka Senapati : हेरगिरीच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक युट्युबर आयबीच्या जाळ्यात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमधून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आता केंद्रीय गुप्तचर विभाग पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशातील हेरगिरांचा शोध घेत आहे. याआधी प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या सह 6 जणांना बेड्या ठोकल्यानंतर आता आणखी एका युट्युबरवर आयबीने संशय घेतला आहे. पुरी येथील युट्युबर प्रियंका सेनापती असे तिचे नाव असून आयबी आणि पुरीचे पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत.

Beed News : बीड जिल्हा बंदची हाक तूर्तास स्थगित

बीडच्या परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. याचे बीड जिल्ह्यामध्ये तीव्रप्रसाद उमटले होते. तर स्वतः मनोज जरांगे यांनी आज शिवराज दिवटेंची भेट घेतली. मात्र उद्या घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र उद्याचा बंद तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे. ही माहिती फेसबुक पेजवरून देण्यात आली असून मनोज जरांगे पाटील सर्व बांधवांची चर्चा करून मोठ्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचेही यात म्हटलं आहे.

Mumbai : मुंबईत तेरा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त, चौघांना अटक

रेहान शेख नावाचा तरुण हा आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एमडी ड्रग्सची विक्री करताना आढळून आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याच्याकडे साडे चार लाखाचे एमडी सापडले होते. त्याच्याकडे कसून तपास केला असता पोलिसांना आणखी चार एमडी विक्रेत्या आरोपींची माहिती मिळाली. त्यांना अटक करून पोलिसांनी या पाचही आरोपींकडून तब्बल तेरा कोटी पेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे.

दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्याने मारहाण केलेल्या शिवराज दिवटे याची आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. लिंबोटा गावचे शिवराज, संदीपान दिवटे हे सर्वच माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. शिवराजला मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जावी. या घटनेत कुठेही जाती धर्माचा संबंध नाही, या पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचेही मुंडे म्हणाले.

Raosaheb Danve : संजय राऊत यांच पुस्तक केवळ आरोप करण्यासाठी, त्याला पुस्तक म्हणता येणार नाही..

एखादं पुस्तक लिहिणं आणि त्या पुस्तकांमध्ये आपला जीवन परिचय, राजकीय जीवनात आणि आयुष्यात कोणत्या संकटांना तोंड दिलं, एवढ्या संकटाला तोंड देऊन मी इथपर्यंत कसा पोहोचलो. जे काही महान नेत्यांनी पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये हे नमूद असतं. परंतु एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहायचं असेल, तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही, असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून लगावला.

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह खालिदची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या..

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या झाली आहे. लष्कर-ए-तोयबाचा सैफुल्लाह खालिद हा टॉपचा कमांडर होता. अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या घालून दहशतवादी सैफुल्लाह खालिदची हत्या करण्यात आलेली आहे. नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रिय होता. सैफुल्लाह याचा भारतात झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता.

Chandrapur Tiger Attack : वाघांच्या हल्ल्यात आठ दिवसात आठ ठार! काँग्रेस नेते वडेट्टीवार संतापले

चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघांची संख्या हे जिल्ह्यासाठी वरदान आहे की शाप? असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी तातडीने बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली. मागील पालकमंत्र्यांनी (मुनगंटीवार) मदतीची रक्कम वाढवण्याचे जाहीर केले होते पण फक्त पैसे देऊन सर्व समस्या सुटणार का? मेलेल्या माणसांचा जीव परत येणार का? असं असेल तर मग वनविभागाच्या माणसांचा जीव द्या आणि त्यांना पैसे द्या, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 

Sharad Pawar : पुरंदरमधील विमानतळाचा प्रश्न शेतकऱ्यांना सोबत घेऊन मार्गी लावा : पवारांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून संवाद साधला आहे. पुरंदरमधील नियाेजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचा प्रश्न शेतकऱ्यांची चर्चा करून मार्गी लावावा, अशी मागणी पवारांनी अजितदादांना केली आहे. पवारांनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने पवारांनी अजितदादांना फोन करून पुरंदर विमानतळाबाबत चर्चा केली.

Mohan Bhagwat : मोहन भागवतांनी घेतले साईबाबांचे दर्शन

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. भागवत यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपुजा करण्यात आली. साईदर्शनानंतर मोहन भागवत यांनी ‘धन्य हो गया’ अशी भावना व्यक्त केली. मोहन भागवत दर्शनाला येणार असल्याने साई मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर मोहन भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Ind Vs Pak : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एकाला हरियाणातून अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणामधून ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. हरियाणातील नूहमधून आरमान नावाच्या व्यक्तीला पाेलिसांनी अटक केली आहे. भारतीय लष्करी कारवायांबाबत नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयात पाकिस्तानी अधिकाऱ्याला व्हॉट्‌स ॲप आणि इतर सोशल प्लॅटफार्मच्या माध्यमातून माहिती देत होता, असे आरोप त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Narkatil Swarg : ठाकरेंच्या पुण्यातील नेत्याने राऊतांचे पुस्तक देवघरात ठेवले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी (ता. 17 मे) ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी राऊत यांचे ते पुस्तक आपल्या देवघरात ठेवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसच्या सल्लागारपदी 2 जिहादी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाचे आरोप असणाऱ्या दोघांना व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. इस्माईल रॉयर आणि शेख हमजा असे या दोघांची नावे आहेत. या निर्णयाचा खुलासा सर्वप्रथम लॉरा लूमर या पत्रकाराने एक्सवर केला आहे.

PMLA चा पहिला फटका मलाच बसला : छगन भुजबळ 

मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा ( PMLA) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कायद्यातील या सुधारित तरतुदीचा पहिला फटका आपल्यालाच बसला असे छगन भुजबळ म्हणाले. या नवीन तरतुदींमुळे माझी अडीच वर्षे तुरुंगात गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्याविरोधात काहीच निघाले नाही, त्यामुळे मी सुटलो. आयुष्यातील अडीच वर्ष आणि किती मानसिक त्रास झाला, या आठवणीने भुजबळ स्तब्ध झाले.

Beed Crime : मनोज जरांगे पाटील यांनी शिवराज दिवटे यांची रुग्णालयात घेतली भेट

बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी  अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली.

UBT : 'स्थानिक'च्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा प्लॅन  

महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोणावर कोणती जबाबदारी?

1. ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर - सुभाष देसाई, राजन विचारे
2. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर- संजय राऊत
3. धुळे, अहिल्यानगर - अनिल परब, संजय राऊत
4. कल्याण - डोंबिवली - अनिल परब
5. उल्हासनगर, पनवेल शहर - अनंत गिते
6. अमरावती, अकोला - अरविंद सावंत
7. नागपूर, चंद्रपूर - भास्कर जाधव
8. वसई - विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर - विनायक राऊत
9. छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे
10. लातूर, सोलापूर - चंद्रकांत खैरे
11. परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर - अंबादास दानवे
12. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड - सुनील प्रभू

Hyderabads: चारमीनार जवळ आग, 17 जणांचा मृत्यू 

हैदराबाद येथील चारमीनार जवळील लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मीर चौक परिसरात ही घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.

Maharashtra Politics live: सात खासदार ठरले संसदरत्न

संसदेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी संसदरत्न पुरस्कार देण्यात येतात. यंदा महाराष्ट्रातील सात खासदार या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तूहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना पुरस्कार जाहीर मिळाला आहे. अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ , मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

संजय राऊतांच्या पुस्तकावर अजितदादांची प्रतिक्रिया

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अटकेनंतर तुरुंगांत घालवलेल्या 100 दिवसांच्या अनुभवांवरून 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मिश्कील टोला लगावला आहे. पत्रकारांनी संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तका संदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "मी काय त्यावर बोलणार नाही, मला काही बोलायचंही नाही. मी हे पुस्तक वाचलेल नाही. शिवाय मला नरकाचं काय माहिती नाही, स्वर्गाचं असेन तर सांगेन, असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला देखील लगावला.

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांचे न्यायालयात पत्र

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात पत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात कारचालकासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी विरोधातील खटला जलदगतीने चालवावा अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरण; विविध संघटनांकडून बीड बंदची हाक

परळी येथील शिवराज दिवटे या तरुणाला टोळक्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या परळीसह बीड जिल्हा बंदची हाक विविध संघटनांकडून देण्यात आली आहे. यामध्ये अनेक मराठा संघटनांचा देखील समावेश आहे.

अमेरिकेत दहशतवादी हल्ला

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील गर्भधारणा केंद्रावर कार बॉम्बने दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे बीड दौऱ्यावर, मारहाण झालेल्या तरुणाची घेणार भेट

मनोज जरांगे बीड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. दिवटे याला मारहाण केल्याप्रकरणी तब्बल 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवटे याला बेल्ट, काठ्या आणि राॅडने बेदम मारहाण करण्यात आली होती.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आंदोलनासाठी आपल्या वाहनाने जात असताना टोलनाक्यावर त्याच्या वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेला संबोधित करून तुपकर  जात असताना हा अपघात झाला. या अपघातमध्ये कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले चौकशी सुरू केली आहे.

युपीएससीची पूर्व परीक्षा 24 मे रोजी होणार

युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेंचे वेळापत्रक लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा 24 मेला होणार आहे. तर, मुख्य परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे.

आम्ही पाकच्या न्युक्लिअर धमक्यांना घाबरत नाही - अमित शाह

उरी, पुलवामा नंतर कारवाई करत इशारा दिला होता आता ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानचे एअरबेस नष्ट केले. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले नष्ट केले. आम्ही पाकच्या न्युक्लिअर धमक्यांना घाबरत नाही. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान घाबरला, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

छत्रपती सहकारी कारखान्यासाठी मतदान

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा मृत्यू

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील कारखान्याला लागलेल्या आगीने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री कारखान्याला आग लागली. आणखी पाच ते सहा जण कारखान्यात अडकून पडल्याची भीती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com