
Shiv Sena News : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे काढणारा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या आपल्या मुलींसह यात्रेत गेल्या असताना टवाळखोरांनी त्यांच्या मुलीचे व्हिडिओ, फोटो काढत त्यांच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार घडला. यामुळे संतप्त झालेल्या रक्षा खडसे यांनी मुलींना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावरून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसजी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला तुम्ही वेशीवर टांगले आहे, अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर घणाघात केला. महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले आहे. एकापाठोपाठ अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने गृहविभागाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.
अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींच्या छेड काढल्याच्या प्रकरणावरून संताप व्यक्त केला. मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचे फोटो, व्हिडियो काढणाऱ्या टवाळखोरांनी शासकीय गार्ड आणि खडसे यांच्या लोकांना धक्काबुक्की केली. हे प्रकरण घेऊन मंत्री खडसे ताई पोलीस ठाण्यात जात असतील तर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती किती पाताळात गेली आहे हे दिसतं आहे. देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला वेशीवर टांगले आहे, हेच यातून स्पष्ट होते. काय करताय आपण? साध्या यात्रेत सुरक्षा देता येत नसेल तर मग मुली सुरक्षित आहेत कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नेमका काय प्रकार?
रावेर लोकसभेच्या खासदार, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी चार टवाळखोरांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या होत्या. खडसे यांच्या कन्येसह काही मुलींची टवाळखोरांनी छेड काढली. त्यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा व्हिडिओ काढला असल्याची माहिती आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कोथळीच्या जत्रेत हा प्रकार घडला आहे. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रक्षा खडसे यांनी आपल्या मुलीसह अन्य मुलींना घेऊन पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी होती. 'आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय', असा संतप्त सवाल रक्षा खडसे यांनी पोलिसांनी केला.
रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत सुरक्षा रक्षक असतानाही हा प्रकार घडला आहे. टवाळखोर अद्यापही मोकाट असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुलींच्या छेडछाडीचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत.या संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेन,असे खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.