Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकांचा जागा वाटपासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची चर्चा सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी त्यानुसार जागावाटपाचे दोन फॉर्म्युले फायनल झाले आहेत. त्यानुसार पहिला फॉर्म्युला वंचित आघाडी, स्वाभिमानी या पक्षांना सोबत घेऊन जागावाटपाचे सूत्र ठरले आहे तर दुसऱ्या फॉर्म्युलानुसार सध्या आघाडीत सहभागी असलेल्या तीन पक्षांत जागावाटप करण्यात आले आहे.
28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाचा वर्धानपदिन पार पडल्यानंतर आघाडीतील तीन घटक पक्षाची मुंबईत बैठक होईल. त्यामध्ये या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर दिल्लीत जानेवारीच्या पहिल्या आठ्वड्यात यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच या जागावाटपाकडे लक्ष लागले आहे.
मविआमध्ये वंचित आघाडीचा समावेश
पहिल्या फॉर्म्युलानुसार लोकसभेच्या 48 जागा लढण्याचा मविआचा निर्धार आहे. त्यामध्ये ठाकरे गट 20 जागांवर लढणार आहे. काँग्रेसच्या (Congress) वाट्याला 16 जागा तर राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार आहे. त्याशिवाय मविआमध्ये वंचित आघाडीचा समावेश होणार असल्याने मविआ वंचितला 2 जागा देणार आहे. त्यापैकी एक जागा वंचित आघाडी राजू शेट्टी (Raju shetty) यांचा स्वाभिमानी पक्ष आघाडीत सहभागी झाला तर त्यांना सोडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2019 साली जिंकलेल्या जागा त्याच पक्षाला मिळणार
दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार वंचित आघाडी, स्वाभिमानी पक्षसोबत आला नाही तर गृहीत धरून आघाडीने जागावाटपाचे सूत्र ठरविले आहे. त्यामध्ये ठाकरे गट 23 जागांवर लढणार आहे तर काँग्रेसच्या वाट्याला 15 जागा तर राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार आहे. जागावाटप करत असताना 2019 साली ज्या जागा निवडून आल्या होत्या. त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
(Edited by Sachin Waghmare)