

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त असलेल्या 17 जागांच्या निवडणुकीची घोषणा होऊन आठ दिवसाचा कालावधी लोटला तरी महाविकास आघाडीच्या गोटात शांतता दिसत होती. तर दुसरीकडे निवडणुकीबाबत आघाडीकडून वेगवान तयारी केली जात नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, उद्या (सोमवारपासून) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असतानाच आता महाविकास आघाडीतील तीन प्रमुख मित्रपक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी रणनीती फायनल करण्यात आली आहे. त्याबाबत ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थित 27 मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
राज्यात येत्या काळात होत असलेल्या 17 विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी महायुतीकडून घोषणा होताच सुरु करण्यात आली आहे. जागावाटपाबाबत बैठका होत असून निववडणुकीची रणनीती ही ठरविण्यात आली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत महाविकास आघाडीच्या (MVA) गोटात शांतता दिसत होती. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार की स्वतंत्र निवडणूक लढणार याबाबत संभ्रम पाहवयास मिळत होता. मात्र, आता महाविकास आघाडीच्या नेत्याची बोलणी सुरु झाली असून तीन प्रमुख मित्रपक्षांनी एकत्रित येत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
याबाबत महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थित 27 मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीविषयी ठरलेल्या रणनीतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यासोबतच जागावाटपाबाबतही यावेळी चर्चा केली जाणार आहे. जागावाटपाबाबत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली आहे. त्याबाबत बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महाविकास आघाडीचे पक्षीय बलाबल पाहता निवडणूक होत असलेल्या सर्वच मतदारसंघात कॉंग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार सर्वच ठिकाणी काँग्रेसला निवडणूक लढविण्याची संधी अधिक आहे. त्याशिवाय गेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला जागा सोडण्यात आली होती. त्या पक्षाचा दावा त्या मतदारसंघावर असणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेसला चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या मतदारसंघात संधी आहे. भाजप आणि काँग्रेसच्या संख्याबळात त्याठिकाणी 30 चाच फरक आहे, पण मित्रपक्ष मिळून याठिकाणी भाजपची सरशी दिसते. अमरावतीमध्ये काँग्रेस मित्रपक्ष आणि अपक्ष आघाड्यांच्या मदतीने आव्हान देऊ शकते. अन्यत्र मविआला फारशी संधी नाही. महायतीत फूट पडली. तरच काही संधी त्यांना मिळू शकते. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.