Maharashtra Politics Live Updates : मोठा निर्णय! मोनोरेल सेवा तात्पुरती बंद

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Live Update
Live UpdateSarkarnama

'सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीनेच निवडणुका...': वडेट्टीवार यांचा घणाघात

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी होणार आहेत. त्या 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान हे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि सरकारने केलेल्या मुदतवाढीच्या विनंतीवरून आदेश दिले आहेत. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सरकारला निवडणुका घेण्यास कोणतीही अडचण नव्हती. पावसाळा सांपत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सगळ्या निवडणुका घेता आल्या असत्या. परंतु, सरकार निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे. कारण सरकारला पोषक वातावरण दिसत नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

मोठा निर्णय! मोनोरेल सेवा तात्पुरती बंद

मुंबई मोनोरेलला अलिकडे वारंवार तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत आहे. सोमवारी (15 सप्टेंबर) देखील एण्टॉप हिल ते जीटीबीएन स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल मध्येच बंज पडली होती. त्यानंतर 17 प्रवाशांना रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुपणे बाहेर काढण्यात आले. यामुळे आता मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Onion Rate Issue : कांदा दरप्रश्नी केंद्रीय पथकाची लासलगावमध्ये शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा

कांदादराच्या प्रश्नावर कल्याण विभागाच्या सचिव सुचिता यादव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक आज लासलगावमध्ये दाखल झाले आहे. चार जणांचे पथक दिल्लीहून आज लासलगावमध्ये आले आहे. या पथकाने बाजार समितीचे संचालक, शेतकरी आणि व्यापारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत कांदा निर्यातीसाठी वीस टक्के सबसिडी द्यावी. प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावं. आयात निर्यात धोरणात शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जावं आणि निर्णय अचानक लागू करू नयेत, अशी मागणी करण्यात आली.

Narendra Modi Birthday : नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा आमच्यासाठी काळा दिवस : प्रणिती शिंदे; भाजपचाही पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. कारण आज देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. विरोधकांना बोलू दिले जात नाही. व्होटचोरीचे प्रकार सुरू आहेत. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्याला आमदार राम कदम यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काळा दिवस आठवायचा असेल तर आणीबाणीचे दिवस आठवा. कशाला काळा दिवस म्हणता. हा काळा दिवस नाही. ही काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात आलेली आजारपणाची लक्षणं आहेत, त्यांना चांगलंही काळं दिसंत.

Manoj Jarange Patil : नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये भेद करू नका; नाहीतर जड जाईल : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत. भावनेशी खेळण्याचे सध्याचे दिवस नाहीत. शेतकऱ्यांना आधार देण्याची सरकारची फार मोठी जबाबदारी आहे. शेतकऱ्याच्या घरात सध्या काहीच राहिले नाही. एसीत बसून तुम्हाला स्थानिक पातळीवर काय काय झाले आहे, हे त्यांना कसे दिसणार. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे एक आणि अधिकारी रेटून दुसरंच दाखवतोय, असंही प्रशासनाकडून व्हायला नको. बीडच्या पालकमंत्र्यांनी सक्त आदेश द्यावेत की, शेतकऱ्यांच्या नुकसनीचे सरसकट पंचनामे करून टाका. शेतकऱ्यांमध्ये भेद करता कामा नये, नाहीतर सरकारला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

Kabirdas Maharaj : बंजारा अन्‌ वंजारी एकच कसा असू शकेल : धनंजय मुंडेंच्या विधानावर पोहरादेवी गडाच्या महंतांचा सवाल

माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाच्या एका मेळाव्यात बोलताना वंजारी आणि बंजारा एकच असल्याचे म्हटले आहे. त्यावर वाशिम येथील पोहरादेवी गडाचे महंत कबीरदास महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंजारी आणि बंजारा एक कसा असेल. बंजारी समाजाची संस्कृती वेगळी, खानपान वेगळे आहे. गावापासून तांडा वेगळा आहे. बंजारा आणि वंजारी समाजाच्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे हे दोन्ही समाज एकच असं कसं म्हणता येईल. हे दोन्ही एकच आहेत, असं म्हणणं शक्यच नाही.

Girish Mahajan : गिरीश महाजनांकडून जामनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरग्रस्त भागाची पाहणी..

जामनेर तालुक्यातील नेरी, चिंचखेडा यांसह विविध गावांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आज नेरी, चिंचखेडा या गावांना भेट दिली.

BJP Ganpat Gaikwad : पोलीस केबिनमधील राडा प्रकरणी, भाजपच्या गणपत गायकवाड यांची निर्दोष मुक्तता

भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2014 साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये राडा घातला होता. त्या प्रकरणी गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदेसह 5 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी गायकवाड अजूनही जेलमध्येच शिक्षा भोगत आहेत.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं वक्तव्य चुकीचं, बंजारा व वंजारा यांच्यात काही संबंध नाही : राजुदास जाधव

बंजारा व वंजारा एकच हे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे शिवसेनेचे राजुदास जाधव यांनी म्हटलं आहे. बंजारा बंजारा व वंजारा या दोन्ही समाजाचा काही संबंध येत नाही. बंजारा समाजाची बोलीभाषा, पेहराव, सण उत्सव साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे, देव-देवतांना आराधणा करण्याची पद्दत वेगळी आहे. यामुळे हे दोन्ही समाज एक असू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आरक्षणातही दोन्ही वेगवेगळ्या वर्गात आहेत, असं ते म्हणाले.

Banjara community And Dhananjay Munde : पंजाबराव चव्हाण यांचा धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध

बंजारा समाजातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध ‘याडी’ कादंबरीचे लेखक पंजाबराव चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कडाडून आक्षेप घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बंजारा आणि वंजारी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक मूल्य वेगळे आहेत आणि या दोन समाजांची तुलना करणे चुकीचे व अन्यायकारक आहे.

Dhananjay Munde Update : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; माजी मंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी

गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे परळी तालुक्याला मोठा फटका बसला असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Amit Shah : 'महान भारत संकल्पनेसाठी तरुण पिढीला ड्रग्जपासून वाचवणे खूप महत्वाचे'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात, "मोदीजींनी 2047 मध्ये एक महान भारत निर्माण करण्याची संकल्पना मांडली. एक असा भारत जो पूर्णपणे विकसित होईल. जर आपल्याला असा भारत निर्माण करायचा असेल, तर आपल्या तरुण पिढीला ड्रग्जपासून वाचवणे खूप महत्वाचे आहे." कारण कोणत्याही महान राज्याची संकल्पना, त्याचा पाया हा त्या देशातील तरुण पिढी असतो. जर आपल्या भावी पिढ्या पोकळ झाल्या तर, देश भरकटेल. दुर्दैवाने, जगभरात ड्रग्जचा पुरवठा होणारे दोन्ही क्षेत्र आपल्याजवळ आहेत. म्हणून हीच वेळ आहे की, आपण त्याविरुद्ध जोरदारपणे लढू, असे मंत्री अमित शाह यांनी म्हटले.

Gadchiroli Update : गडचिरोलीत देवाभाऊच्या नावाने बॅनरबाजी; दीड हजार कोटी रुपये बिलं थकवल्याचा आरोप

Gadchiroli Update
Gadchiroli UpdateSarkarnama

गडचिरोली जिल्ह्यातील विविध सरकारी योजनांसाठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांची परिस्थिती गंभीर झाल्याने कंत्राटदार असोसिएशन, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना आणि मजूर सहकारी संघटना यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. सरकारकडून कंत्राटदारांची बिले जमा झाली नाहीत. यामुळे कर्जबाजारी झाले आहे. जवळपास 1500 कोटी रुपयांची बिले थकीत पडली आहेत. या आर्थिक संकटामुळे कंत्राटदार हताश झाले आहेत आणि आत्महत्येच्या पाऊलाकडे जात आहेत. कंत्राटदार आत्महत्या करत आहेत. देवाभाऊ आणखी किती ठेकेदारांना आत्महत्या करायला लावणार? हा प्रश्न प्रशासन आणि सरकारला टोचणारा आहे. बिले त्वरित भरून काढण्याची मागणी करत संघटनांनी जिल्ह्यात बॅनरबाजीचा कार्यक्रम राबवला आहे.

UP CM Yogi Adityanath : 'शिक्षकांच्या पात्रता आणि सेवा वर्षांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मूलभूत शिक्षण विभागातील शिक्षकांसाठी अनिवार्य टीईटीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पुनरावृत्ती दाखल करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. राज्यातील शिक्षक अनुभवी आहेत आणि त्यांना वेळोवेळी सरकारने प्रशिक्षण दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत त्यांची पात्रता आणि सेवा वर्षांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

Nilesh Lanke : अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; खासदार लंकेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगांव, पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टीसम परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Radhakrishna Vikhepatil : अहिल्यानगरच्या पूरस्थितीत मंत्री विखे पाटील उतरले ग्राऊंडवर....

यापूर्वी कधीही झाला, असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल. स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचा आदेश प्रशासनास दिले आहेत. परंतु मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Maharashtra Politics Live Updates : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मंत्रिमंडळाची बैठक नाही

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी छत्रपती संभाजीनगर येथे होणारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक यंदा होणार नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतरवा नाईक यांनी सुरु केलेली परंपरा यंदा खंडित होणार आहे.

Maharashtra Politics Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस करणार मराठवाड्याचा दौरा

मराठवाड्यातील बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौरा करणार आहेत.

Maharashtra Politics Live Updates : बंजारा आणि वंजाराी या जाती म्हणून वेगळ्या

बंजारा आणि वंजारी या दोन्ही जाती म्हणून वेगळ्या आहेत. पण आम्ही म्हणताना पहिल्यापासून बंजारा आणि वंजारा असेच म्हणतो असे स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

Maharashtra Politics Live Updates : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मराठवाड्यातील बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या जिल्ह्यांमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे.

Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू युवराज सिंहला ईडीचे समन्स

माजी क्रिकेटपट्टू युवराज सिंह ईडीचे समन्स आले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणी हे सम्सन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.

Ladki Bahin Yojana : मराठवाड्यात सव्वा लाख लाडक्या बहिणी अपात्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला, 65 वर्षाच्या वरील महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते, तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले, त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला. यात मराठवाडा परिसरात सव्वा लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे.

Solapur congress Live : काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. काँग्रेसकडून त्या दोन वेळा विजयी झाल्या होत्या. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सक्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षासह त्यांचा महिला चळवळीतही सक्रिय सहभाग होता. सोलापूर शहर दक्षिण मधून काँग्रेसकडून 1972 ते 1976 या काळात त्या विधानसभेवर तर त्यानंतर त्या विधान परिषदेवर आमदार राहिल्या.

Local body election 2025: महापालिका निवडणुकीबाबत आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे. जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढ मिळावी, अशी मागणी सरकारने केली आहे. त्यावर आज सुनावणी आहे.

Maharashtra Electric Bike Taxi Fare : राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला परवानगी

राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत परवानगी दिली आहे. आता राज्य सरकारने या बाइक टॅक्सीचे भाडेदर निश्चित केलं आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Amravati Live: बॅनरवर प्रिती बंड यांचा फोटो नसल्याने वाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अमरावतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ता लावलेल्या फलकावरुन शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो नसल्याचे वादाला तोंड फुटलं आहे. प्रीती बंड यांनी काही महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर धाने पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Congress-NCP : काँग्रेस नेते नाना पटोले अजितदादांच्या भेटीला

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यांची ही भेट नेमकी कशासाठी आहे हे माहिती नसलं तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

OBC : समता परिषदेचा 18 सप्टेंबरला नागपुरात ओबीसींचा मेळावा

काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आंदोलनाची तयारी सुरू केली असतानाच आता महात्मा फुले समता परिषदेने देखील मेळावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना आणि बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला असून याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी ओबीसींनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे आणि विशाल हजारे यांनी केलं आहे.

Pune Rain Updates : पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढील 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सचेत अँपने वर्तवली आहे. यासाटी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Siddharth Shinde Passed Away : सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आल्यानंतर एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे नातू होते.

Beed Rain Update News: मुसळधार पावसामुळे 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. या दोन दिवसात 15 हून जास्त महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून या पावसाचा सर्वाधिक फटका आष्टी शिरूर कासार अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यांना बसला आहे. या ठिकाणच्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी नागरिकांना वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते. तर दुसरीकडेमाजलगाव आणि मांजरा धरणातून अद्यापही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आज बीड जिल्ह्यातील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार

बहुचर्चित नवी मुंबई येथील विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहुर्त अखेर ठरला आहे. सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार असल्याचं सांगितलं आहे. हे देशातलील सर्वात मोठे विमानतळ आहे. तर येथील ऑपरेशन नोव्हेंबर महिन्यात नियमित सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com