.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरेंवर ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मदत करत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
विधानसभेला महायुतीचे 232 आमदार निवडून आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा विजय होणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत सर्वत्र महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. मुंबई महापालिकेत महायुती जिंकली नाही, तर मुंबई 25 वर्ष मागं जाईल असंही शिंदे म्हणाले.
30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी घेऊन दौऱ्याला जाणारा एकनाथ शिंदे नाही. फेसबुक लाईव्ह करणारा हा एकनाथ शिंदे नाही,उद्धव ठाकरेंवर शिंदेंनी घणाघाती टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात बाळासाहेबांचा मूलमंत्र 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण आपण जपत असल्याचं सांगितलं. जिथं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धाऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेंचा शब्द असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात केलेल्या कामामुळे देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर आपले मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली.
‘जे भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत आणि म्हणत आहेत की, यांनी मुंबई जिंकली तर खान महापौर होणार.पण अरे तुम्ही मुंबई जिंकली तर, त्या अदानीच्या चरणावर तुम्ही मुंबई समर्पयामी करून टाकाल. जानवं घालालं, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी असं म्हणाल. तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे पाहता, आम्ही जीव म्हणून मुंबईकडे पाहतो.
आम्हाला जर हिंदूत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. तुमचं ते फडकं आहे, तो भगवा असू शकत नाही. कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे. आधी फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावर या.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आलेल्या मुस्लिम शिवसैनिकाने महायुती सरकरावर जोरदार घणाघात केला असून गद्दारांना 50 खोके, पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत अशी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज (२ ऑक्टोबर) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत आहे. यावेळी आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या मेळ्याला राजकीयदृष्ट्याही अधिक महत्त्व आहे. यावेळी भाषणाला सुरुवात करतानाच चिखलाचा उल्लेख करत याला कारण कमळाबाई, असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यात पावसाने यंदा थैमान घातल असून मराठवाडा सोलापूर, जालना, मध्य या भागतील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट बरंसल आहे. शेतातील पिके तर नष्ट झालीच आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांचे पशुधन म्हणजेच गाय बैल शेळ्या सर्व पाण्यात वाहून मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. अशावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी खाटीक समाजाने एक अनोखी मदत योजना राबविली आहे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना बकरी व बोकड भेट देण्यात येणार आहेत.
एकनाथ शिंदे साहेबांनी सामाजिक भान ठेवत आझाद मैदानातील मेळावा रद्द केला आणि नेस्को मध्ये घेतला. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि पूरग्रस्त भागातील लोकांची मदत शिवसैनिकांनी करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. पण जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कांग्रेसवाले घाणेरडं बोलतात त्यांच्या मांडीवर जाऊन युबीटीवाले बसतात अशी टीका उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी केली आहे.
शेतकरी आणि कष्टकरी जनतेच लक्ष दुसरीकडे जाव. यामुळेच आय लव महादेव, आय लव मोहम्मद असा वाद मुद्दामून केला गेला आणि काही आमदार विरोधातले नेत्यांना खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. त्यांना पाठबळ त्यांच्याच नेत्यांनी दिलं आहे. देवेंद्र फडणवीस स्वच्छ आहेत आणि ते सुंदर बोलतात. पण त्यांनी त्यांच्याजवळ बहुजन समाजातील नेते, पडळकर, राणे त्यांना खालच्या लेवलला जाऊन टीका करण्यासाठी ठेवलं आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
बीडमधील नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावरून आणि कारखान्यांकडून 15 टक्के वसूलीच्या निर्णयावरून सरकारला थेट फैलावर घेतले. जरांगे यांनी, संकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांला मदत करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी. त्यासाठी सेलिब्रिटी आणि राजकारण्यांकडून पैसे घ्यावेत थेट हल्लाबोल केला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषण करणारे दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. ते 16 दिवस आमरण उपोषणावर बसले होते. ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर समाज बांधवांच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण सोडलं आहे. मुलीगी आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. दुपारी पावसाने हजेरी लावल्याने मैदानात सर्वत्र चिखल झाला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर चिखल असतानाही मोठी गर्दी झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. या मेळाव्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात आला असून, सुमारे वीस हजार आसन व्यवस्था करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे कटआउट्स लावण्यात आले आहेत. 'यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, स्थळ बदलतंय परंपरा नाही' असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सुरुवातीला आझाद मैदानावर नियोजित असलेला हा मेळावा पावसामुळे नेस्को सेंटरमध्ये हलवण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपयांची रोख मदत द्यावी. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. पीकविमा दिल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तर मंत्र्यांना प्रचाराच्या सभा घेऊ देऊ नका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्या नाही तर सरकारला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून बोलताना दिला.
हैदराबाद गॅझेट हे निजामाने केलेलं गॅझेट आहे. ज्या निजामाला आपण तीन वेळा हरवलं, त्या निजामाचं गॅझेट आपण का स्वीकारतोय? हे मला कळत नाही. मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही, असं विधान शाहू महाराज यांनी केलं हेातं. तसेच, पंकजा मुंडे यांनीही अशा आशयाचे विधान केले होते. त्याला मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून उत्तर दिले आहे. निवडणुकीच्या आधी अगोदर आपल्याला डिवचतात, मी उत्तर दिलं की ते तीन ते चार महिने गप्प बसतात. ते एक शब्द आपल्या काळजाला लागेल असं बोलतात. जसं की, गुलामीचं गॅझेट म्हणणारे माकडं, अवलादी, भिकार अवलादी. गुलामीचं गॅझेट म्हणायचं आणि तीन ते चार महिने गप्प बसायचं. ते एकटेच नाहीत, असं जे जे बोलतात त्यांच्याबद्दल सांगतो.
आता आपल्याला शासक आणि प्रशासक बनायचे आहे. सत्ता असो अथवा नसो प्रशासनात आपण पाहिजे. दारिद्रयाचा डाग काढायचा असेल तर शासक बना. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं वागावं. जातीची अडचण दूर करण्यासाठी शासक बना, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. जीवनात येऊन जे साध्य करायचं असतं, ते आतापर्यंतच्या वाटचालीत साध्य केलं आहे. मुंबईपर्यंत तुम्ही मला साथ दिली. पण पांढऱ्या कपडेवाल्यांनी मराठ्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी मराठा पुढाऱ्यांवर केली.
दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचेही तुकडे उचलू नका, कुणाचेही पैसे घेऊ नका. खोटे धंदे आणि कामे करू नका. गुंड-बिड पाळू नका. हे करायची काही गरज नाही. चांगल्या माणसाचं चांगलचं होतं, कारण भगवानबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो. मला तुमचा अभिमान आहे. तुमच्यासाठी मी नतमस्तक होते, असेही पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात सांगितले
भक्तिगडावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंनी दिलेल्या आधाराचा आवर्जून उल्लेख केला. अडीचशे दिवस मला माझ्या बहिणींनी आधार दिला. तासनतास माझ्याजवळ बसत होती. माझ्या विरोधात कोर्टात गेले आहेत, त्यांना एक लाखाचा दंड करण्यात आला आहे, असा दावाही धनंजय मुंडे यांनी केला.
69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांची दीक्षाभूमी परिसरात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव घाट इथे होत असून या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी दाखल होत असतो. भगवान भक्ती गडावरुन मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिले आहे. 'जास्तीत जास्त मदतीसाठी सरकार प्रयत्नशील' असून 'दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.. 'नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत असही पवार म्हणाले.
दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील हे नारायण गडाकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील रुग्णवाहिकेतून गडाकडे रवाना झाले आहेत. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेंचा मेळावा म्हणजे गद्दारांचा मेळावा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे, शिवाजी पार्कातून गद्दारांच्या मेळाव्यावर चिखलफेक करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरबाड येथील नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. . यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर मेळावा आयोजित केला आहे. अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. अजित पवार कार्यक्रम स्थळी पोहचले आहेत
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे. बारा वाजता नारायणगडावरून जरांगे काय बोलणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
स्वतःच्या स्वार्थासाठी अमेरिकेने अलिकडेच लागू केलेले आयात शुल्क धोरण आपल्याला काही पैलूंवर पुनर्विचार करण्यास नक्कीच भाग पाडणार आहे. जग परस्परावलंबनावर चालते. तथापि वैश्विक जीवनाची एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होऊन जीवन जगणे आवश्यक आहे. दुसऱ्या देशांवर असलेली आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी, स्वावलंबनाला दुसरा पर्याय नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पोलिसांना चकवा देत युरोपमध्ये गेला होता. त्याला पासपोर्ट कसा मिळाया याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, युरोपमधून निलेश घायवळची पत्नी आणि मुलगा भारतात परतले आहेत. मात्र, पोलिसांच्या भीतीने फरार आहेत. तर, निलेश घायवळ अजुही युरोपमध्ये असल्याची माहिती आहे.
भारत जगाला दिशा दाखवू शकतो. मागील 100 वर्षात महापुरुषांच्या चिंतनाला घेऊन संघ काम करतोय. विविध संस्था, स्थानिक स्तरावर, व्यक्तिगत स्तरावर स्वयंसेवक सक्रीय आहेत. या सगळ्याच्या आधारावर संघाचे चिंतन आहे. सारे जग पुढे गेला आपण देखील पुढे गेले आहोत. आता मागे पाहिले तर गाडी उलटेल. मात्र हळुहळु आपल्याला मागे वळून पाहावे लागले. कामाच्या मागे धावणाऱ्यांना धर्माची दृष्टी द्यावी लागेल, धर्म म्हणजे सर्वांना जोडणार, सर्वांना उन्नत करणाऱ्या धर्माचे उदाहरण आपल्याला जगाला दाखवावे लागेल.
श्रीमंतांमधील आंतर वाढत आहे. जगभरातील सारा समाज अराजकतेकडे जातोय की काय, असे वाटते. जगभरातील विकासतही दोष दिसत आहेत, असे मोहन भागवत म्हणाले.
अमेरिकेने टॅरिफ हे त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी लागू केले आहे. मात्र, परदेशांशी संबंध ठेवत आपल्याला स्वदेशी आणि स्वलंबनाचा वापर करावा लागेल. स्वदेशी, स्वावलंबनाला पर्याय नाही, असा संदेश विजयदशमी सोहळ्यात मोहन भागवत यांनी दिला.
उत्तर भारतीय एकता मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी - नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रमाअंतर्गत राजकीय पक्षाने जिल्ह्यातील पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता सहकार्य करावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले.
राज्यात आज विजयादशमी निमित्त पाच मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणार आहेत. नागपूरातील रेशीम बागेत संघाच्या मेळाव्याला सुरुवात झाली असून आज मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे मेळावे होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.