बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात जनसभा घेत सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, सरकार आम्हाला सातत्यानं लुटत आहे. पण वेळ पडली, तर आम्ही नेपाळसारखे घरात घुसू, आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवू असं कडू यांनी म्हणत हल्लाबोल केला आहे.
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्यात आली होती. आता पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव विश्वंभर तिरुखे असं आहे. तो मनोज जरांगे यांचा जवळचा सहकारी असल्याचं बोललं जात आहे.नवनाथ वाघमारे यांनी आरोपीच्या मागे मनोज जरांगे असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर यांचा आज होणारा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. पहिल्यांदा खासदार नारायण राणे यांची तब्येत बिघाडल्याने, तसेच मराठा आरक्षण आंदोलनामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. तर आजच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कालच दोन दिवसांनी तुमचा पक्षप्रवेश होणार आहे, असे सांगण्यात आले होते. माझं काम आजपासून सुरू झालं आहे. कोकणात आता कमळ फुलणार असून मनसेसाठी ज्या पद्धतीने काम केले, त्याच्या दुप्पटीने आता भाजपचे काम करणार आहे, असे खेडेकर यांनी सांगितले.
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरकडे येणारा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वडकबाळ येथील पुलाच्या दोन्ही बाजूला महामार्गावर पाणी आले आहे, त्यामुळे विजापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कुरूल, कामती, मोहोळमार्गे वळविण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ येथे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले होते. त्यांची पुरातून सुटका करण्यासाठी एनडीआरएफची टीम गावात गेली होती. मात्र, पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना माघारी परतावे लागले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लष्काराशी संपर्क साधून मदत मिळविली. त्यानुसार आर्मीच्या हेलिकॉप्टरने दारफळमधील पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना एयरलिफ्टिंगद्वारे बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. आणखी सुमारे 20 नागरिक अडकलेले असून त्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी हा तर आमचा संकल्पनामाच आहे. पण कर्जमाफीसाठी सरकारने जी समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल आल्यानंतर गरजू शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देण्याची घोषणा करेल. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून माफी दिली पाहिजे. मात्र, काहींचे मोठे फार्महाऊस असते, मोठे घर बांधलेले असते, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसते. पण ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे, त्यावर समिती सध्या काम करत आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन पार पडले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियनच्या गुंतवणुकीचा शुभारंभ केला. ही गुंतवणूक, राज्यात कार्यरत असलेल्या $3.7 बिलियनच्या डेटा सेंटर्स व्यतिरिक्त केली जाणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि नेत्यांविषयी सातत्याने बदनामीकारक, असत्य आणि भ्रामक मजकूर प्रसारित करुन धार्मिक तेढ निर्माण करुन जातीय सलोखा बिघडवण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सोशल मिडीयातील पेजेसविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख आमदार महेश सावंत यांनी आज सायबर क्राईमच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुवर्णा शिंदे ह्यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करुन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार आहे. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे
रांजणगाव गणपती या गावातील विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत बैठक घेतली. हे गाव अष्टविनायकांपैकी एका गणपतीचं स्थान असल्यामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. दररोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. शिवाय या गावाच्या लगत एमआयडीसी आहे. इथं असणारे कामगार तसंच हे गाव प्रमुख रस्त्यालगत असल्यानं बाहेरील स्थलांतरीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर गावातील पायाभूत सुविधा सक्षम करणं अत्यावश्यक आहे. या भागातील वाढती लोकसंख्या आणि भाविकांचा सततचा ओघ लक्षात घेऊन एमआयडीसीनं या भागात विकास कामं करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश बैठकीत दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्जमाफीबाबत मोठं विधान केले आहे. राज्याला पावसाने झोडपून काढले असून नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या अस्मानी संकटानंतर आता विरोधी पक्षांनी कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना शिंदे यांनी सरकार कर्जमाफीबाबत गंभीर असून योग्य वेळ आली याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तसेच सध्या शेतकऱ्यांना सध्या सरकारकडून तातडीची मदत केली जात असल्याचेही ते म्हणाले.
मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पोहचले. यावेळी यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत गिरीश महाजन यांचा ताफा अडवला. आमच्या बांधावर या म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णयानुसार पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगावसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी खडसेंनी केली.
आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी येत्या 30 तारखेला नंदुरबार मध्ये उलगुलान मोर्चा होणार आहे. आमदार आमश्या पाडवी हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. आदिवासीचा आरक्षणात कोणालाही घुसू देणार नाही असं पाडवी यांनी ठणकावलं आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीक नुकसानीसाठी सरकारकडून २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतील. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात झालेल्या पावसामुळे नुकसान हे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची सरकारकडे केली आहे. नवरात्र महोत्सव आहे. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल, यासाठी कामाला लावण्याची गरज आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या हातातील बाहुली असून ते जेवढी चावी देतील तेवढेच बोलणारे, असेही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.
शेतकऱ्यांना कर्जमाफीची कोणती योग्य वेळ असेल तर, हीच ती वेळ आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, या पूरस्थितीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा. यात आम्ही देखील विरोधक कोणतेही राजकारण आणणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. अशा परिस्थितीत राजकारण करणे हास्यास्पद आहे. त्यांच्या काळात काय झालं होतं, यात मी जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
राज्यात पूर परिस्थितीत आहे. अनेक भागात पुराचा फटका बसला आहे. अतिवृष्टीतील बचाव कार्यासाठी अतिरीक्त हेलिकाॅप्टरची मागणी मार्गी लावली आहे. आठ जणांचा मृत्यू, दहा जण जखमी झाले आहे. नुकसानीचे पंचनामे जशी होतील, तशी मदत करत आहोत. 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत केली आहे. 2 हजार 215 कोटींची मदत केली आहे. खालपर्यंत 1 हजार 829 कोटी रुपये पोचले आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात पैसे जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाला आहे. ही भरती बेकायदा केल्याचा आरोप माजी संचालक मयूर पाटील यांनी केला आहे. नोकर भरती करताना फक्त बाजार समितीमधील आजी-माजी संचालक आणि अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना भरती करून घेतले आहे. याप्रकरणी पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 24 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील मुसळधार पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसंच तीन हेक्टरपर्यंत मदत द्यावी. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवला. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसे उधळण्यापेक्षा आपतग्रस्तांना मदत जाहीर करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे.
बच्चू कडू येण्याआधीच शेतकऱ्यांनी चंद्रपूर-नागपूर महामार्ग बंद केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार होते. पण संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम करीत वाहतूक रोखून धरली. चंद्रपूर नागपूर महामार्गावरील वरोरा तालुक्यातील खांबाडा इथं हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
ओबीसी समाजाच्या नागपूर इथं 28 तारीखला निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ इथं ओबीसी समाजामार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले आहे. कुडाळ इथल्या जिजामाता पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरूवात करण्यात आली. या आंदोलनातून हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी जालना इथं शेतकऱ्यांनी बोंब मारो मोर्चा काढला. मोर्चामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक सोबत घेऊन शेतकरी सहभागी झालेत. जालन्यातील अंबड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा हा मोर्चा धडकला.
पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होत आहे. बैठकीत राज्यातील पूरस्थितीसह शेतीच्या नुकसानीच्या आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीत राज्यातील ओला दुष्काळ जाहीर होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार माजला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड आणि धाराशिव येथे आजही रेस्क्यू सुरू आहे. परभणीत आर्मीचे पथक बोलावण्यात आले आहे.
मागील अधिवेशनात मी महाराष्ट्र सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, असे म्हटले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.
राज्यभरात पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकं कुजल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन हे भरोसाचे पीकही हातातून गेले, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.पावसाचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
सोलापुरातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त गावात पाहणी केली. मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरटगाव येथे खासदार प्रणिती शिंदे नागरिकांशी संवाद साधला. सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्याचा नियोजित पुणे दौरा रद्द केला आहे. ते मराठवाड्यातील पुरस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत पाच जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे.
बाबा गुजर हे मागील आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर आहेत. ते शरद पवार गटात असतांना 6 वर्ष जिल्हाध्यक्ष होते. तर पक्षफुटीनंतर 8 वर्ष पदावर राहिलो शिवाय आता प्रकृती खराब असल्यानं आणि दुसर्यांना संधी देण्यासाठी राजीनामा देत असल्याचं बाबा गुजर यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
धाराशिवमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आता धाराशिवममधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. मराठवाड्यात तर पावसाने रौद्ररूप धारण केलं असून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून या आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एनडीआरएफच्या पथकांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे. अशातच पावसाच्या पाण्यात परंड्यातील वडनेर येथेल एक कुटुंब पाण्यात अडकलं होतं. त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वत: पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालं. ओमराजे निंबाळकर यांनी NDRF सोबत केलेल्या बचावकार्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत वडनेर ता.परंडा येथील नागरिकांचे प्राण वाचविल्याचा मनस्वी आनंद झाल्याचं म्हटलं आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
बीडसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाने हाहाकार घातला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने बीड जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.