ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहे. आधी त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर त्यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ते पैशाच्या व्यवहारा संबंधित बोलत होते. अशातच आता बीडमध्ये होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आलं आहे. बीडमध्ये हे बॅनर लागल्यानंतर हाके यांनी आपल्या सोशल हँडलवर भावनिक पोस्ट देखील केली. 28 तारखेला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना बॅनरवर स्थान न दिल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.